साम्यवाद्यांच्या केरळमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या सूचीत मद्याचा समावेश

कोणत्या वस्तूला जीवनावश्यक म्हणावे, हेही न कळणारे जनताद्रोही साम्यवादी सरकार ! आपत्काळात जनतेला संयमाने वागायला शिकवण्याऐवजी त्यांना मद्यपी बनवणारे सरकार कसा कारभार करत असेल, याचा विचारही न केलेला बरा !

कोची – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात ‘दळणवळण बंदी’ घोषित केली आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. असे असतांना केरळ राज्यात मद्यविक्री चालू रहाणार आहे; कारण केरळमध्ये मद्यासह सर्व प्रकारचे पेय पदार्थ जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत अंतर्भूत करण्यात आली आहेत. सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. ‘राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यात धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. सरकारने निर्णय तात्काळ मागे घ्यावा’, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. केरळ सरकारला मद्य विक्रीतून २ सहस्र ५०० कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळते. राज्याच्या एकूण उत्पन्नाच्या ते १५ टक्के आहे.

विरोधी पक्षांनी टीका केल्यावर मुख्यमंत्री पी. विजयन् यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले. या निर्णयाच्या समर्थनार्थ पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या एका कथित ट्वीटचाही संदर्भ दिला. विजयन् यांनी म्हटले, ‘माझ्याकडे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा एक संदेश आहे. पंजाबमध्ये सर्व आवश्यक सेवा चालू रहातील. उदा. किराणा सामान, मद्य…’ त्यामुळे केरळ राज्यात निर्माण झालेली विचित्र परिस्थिती लक्षात घेता अशा प्रकारचा उपाय करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने घोषित केलेल्या दळणवळण बंदीच्या काळात मद्य विक्रीवर निर्बंध घातले, तेव्हा वेगळा अनुभव आला होता. अनेक सामाजिक प्रश्‍न निर्माण झाले होते.’ (स्वातंत्र्यप्राप्तीपासून गेल्या ७२ वर्षांत एकाही राजकीय पक्षाने समाजाला धर्मशिक्षण न दिल्यानेच मद्यावर बंदी घातल्यामुळे सामाजिक प्रश्‍न निर्माण होतात ! – संपादक)