कोरोनावर मात करून विजयाची गुढी उभारूया ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

हातावर पोट असणार्‍यांचे दायित्व घेणार असल्याचे आश्‍वासन

मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र भगवामय होऊन जातो. ढोल-ताशे आदी वाद्यांचा गजर होतो; मात्र आज महाराष्ट्र शांत आहे. आपणाला गुढीपाडवा अवश्य साजरा करायचा आहे. यंदा कोरोनाच्या संकटावर मात करून विजयाची गुढी उभारूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले. २५ मार्च या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन कोरोनावर मात करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले.

ठाकरे पुढे म्हणाले,

१. या संकटाकडे आपण नकारात्मकतेने पहात आलो आहोत; मात्र या निमित्ताने घराघरांत कुटुंबे एकत्र आली आहेत, ही चांगली गोष्ट आहे. कुणी वाचन करत आहेत, कुणी संगीताचा सराव करत आहेत, तर कुणी कॅरम, पत्ते खेळत आहेत. काही जण वाद्ये वाजवत आहेत. आपण जे गमावले होते, त्याचा आनंद आता घेत आहोत, हे चांगले आहे.

२. या संकटाची तुलना आपण जागतिक युद्धाशी केली आहे. शत्रू जेव्हा समोर नसतो, तेव्हा तो अधिक धोकादायक असतो; कारण तो कुठून वार करील, ते सांगता येत नाही. हा शत्रूही तसाच आहे. त्यामुळे घराबाहेर पडू नका.

३. ज्याचे नियमितच्या रोजीरोटीवर पोट आहे, त्यांचेही दायित्व शासन घेणार आहे. अनेक आस्थापनांचे मालक, उद्योगपती मला संपर्क करून साहाय्य करण्यासाठी पुढे येत आहेत. आज साहाय्य करतांना तुमचे कारखाने, आस्थापने बंद आहेत; मात्र माणुसकी म्हणून कामगारांचे किमान वेतन थांबवू नका अन्यथा आणखी एक मोठे संकट येईल.

४. शेतीची कामे चालू आहेत. भाजीपाल्याची दुकाने बंद करणार नाही. त्यामुळे कोणीही झुंबड करू नका. हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र आहे. त्यामुळे हे युद्ध आपण निश्‍चित जिंकणार आहोत.