कोरोनाकडे गांभीर्याने न पाहिल्याने युरोप आणि अमेरिका यांची झालेली स्थिती पाहून भारतीय आतातरी सावध होतील का ?
नवी देहली – जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर त्याची तीव्रता लक्षात येत आहे. चीनमध्ये याचा प्रादुर्भाव होत असतांना अनेक देश त्याकडे गांभीर्याने पहात नव्हते. युरोपमधील इटली, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन, तसेच अमेरिका येथे जनता त्याकडे गांभीर्याने न पहाता मौजमजा करत होती; मात्र आता तेथील स्थिती अत्यंत वाईट झाली असून ६ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू, तर १ लाखाहून अधिक जणांना याची लागण झाली आहे. सर्वत्र दळणवळण बंद (लॉकडाऊन) करण्यात आले आहे. आता त्यांना निष्काळजीपणा केल्याचे भोग भोगावे लागत आहेत, असे म्हटले जात आहे.
१. जर्मनीमध्ये ‘कोरोना पार्ट्यां’चे आयोजन !
कोरोनाच्या प्रादुर्भावाला प्रारंभ झाला, तेव्हा जर्मनीमध्ये अनेक ठिकाणी तरुणांकडून ‘कोरोना पार्ट्या’ आयोजित करण्यात आल्या होत्या. कोरोनावरून सामाजिक माध्यमांतून विनोदही केले जात होते. वृद्धांची थट्टा उडवली जात होती. त्यांना पाहून ‘कोरोना कोरोना’ असे ओरडले जात होते. सध्याची स्थिती पाहिल्यावर येथे जमावबंदी करण्यात आली आहे. स्वतः जर्मनीच्या चान्सलर (प्रमुख) अँजेला मर्केल यांच्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने मर्केल यांनी स्वतःला अलगीकरणामध्ये ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी त्याही सार्वजनिक ठिकाणी जात होत्या.
२. फ्रान्समध्ये समुद्रकिनारी मौजमजा !
येथे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतरही लोक त्याकडे गांभीर्याने न पहाता समुद्रकिनारी मौजमजा करत होते. दळणवळण बंद केल्यानंतरही ते त्याला प्रतिसाद देत नव्हते. फ्रान्सचे गृहमंत्री क्रिस्टॉफ कॅस्टानेर म्हणाले की, काही जण नियमभंग करून स्वतःला ‘हिरो’ समजत होते. वास्तविक ते मूर्ख होते. स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबियांना धोका निर्माण करत होते. ते मेजवानी आणि ‘क्लब’मध्ये जात होते.
३. अमेरिकेमध्येही मेजवान्यांमध्ये लोक होते मग्न !
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये प्रतिबंध असतांनाही तरुण समुद्रकिनारी मेजवान्या करत होते. न्यूयॉर्कचे राज्यपाल अँड्यू क्युमो यांनी म्हटले की, कोरोनाचे सापडलेले रुग्ण १८ ते ४९ या वयोगटातील आहेत. ‘तरुणांनी लक्षात ठेवले पाहिजे की, तुम्ही ‘सुपरमॅन’ किंवा ‘सुपरवुमन’ नाहीत की तुम्हाला कोरोना होऊ शकत नाही.
४. इटलीमध्ये राज्य सरकारचा हलगर्जीपणा !
इटलीमध्ये १० मार्चपासूनच दळणवळण बंद करण्यात आले होते; मात्र लोकांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही. अनेक जण बाजारामध्ये खरेदी करत होते. हॉटेलमध्ये जात होते. ‘क्लब’मध्ये जाऊन रात्री उशिरापर्यंत मेजवान्या करत होते. यामुळेही येथील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. नंतर सरकारने सैन्याला तैनात केल्यावर सर्व बंद झाले. इटलीच्या लोम्बार्डीमध्ये दळणवळण बंदीचे पालन न केल्याने आणि तेथील राज्य सरकारनेही सवलत दिल्याने तेथे कोरोनाची सर्वाधिक लागण होऊन रुग्णांचा मृत्यू झाला.
५. शेकडो लोकांचा मृत्यू झाल्यानंतरही स्पेनमध्ये लोकांकडून नियमांचे उल्लंघन चालूच !
स्पेनमध्ये लोक दळणवळण बंद असतांनाही बाहेर पडत असल्याने पोलीस हेलिकॉप्टरच्या साहाय्याने त्यांना शोधून त्यांना पकडत आहेत. येथे एका महिला तिच्या मित्राला भेटायला जात असतांना तिला अटक केली. एका ‘अॅप’मुळे या दोघांची मैत्री झाली होती आणि ते भेटू इच्छित होते. पोलीस आयुक्त जोस एंजेल गोंजालेज यांनी म्हटले की, लोक बंदी मोडून कृती करत आहेत. त्यांना अटक करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे.