हुतींची आक्रमणे यापुढे सहन न करण्याची ट्रम्प यांची चेतावणी

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या सैन्याने येमेनमधील हुती आतंकवाद्यांवर केलेल्या हवाई आक्रमणात २१ जण ठार झाले. ४ महिन्यांपूर्वी हुती आतंकवाद्यांनी लाल समुद्रात अमेरिकी युद्धनौकांवर अनेक आक्रमणे केली होती. त्याचा सूड अमेरिकेकडून उगवण्यात येत आहे. डॉनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर हुतींवरील हे पहिलेच आक्रमण आहे.
ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले की, हुती आतंकवाद्यांनो, तुमचा वेळ संपला आहे. अमेरिका तुमचा आकाशातून असा विनाश करेल, जो तुम्ही यापूर्वी कधीही पाहिला नसेल. इराण या आतंकवाद्यांना निधी देत आहे. इराणने हुती आतंकवाद्यांना पाठिंबा देणे थांबवावे. अमेरिकेला धमकावण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही असे केले, तर अमेरिका तुम्हाला पूर्णपणे उत्तरदायी ठरवून कारवाई करील. जो बायडेन यांनी या आक्रमणांच्या विरोधात कधीही कठोर कारवाई केली नाही;म्हणूनच हुतीचे आतंकवादी लोक न घाबरता आक्रमण करायचे. अमेरिकी नौकांवरील हुतींची आक्रमणे यापुढे सहन केली जाणार नाहीत.