तेल अविव (इस्रायल) – इस्रायलने युद्धबंदीनंतर १८ मार्चच्या सकाळी गाझावर पुन्हा एकदा आक्रमण केले. इस्रायलच्या या हवाई आक्रमणात किमान २३५ लोक ठार झाल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. गाझामध्ये आतापर्यंत झालेले हे सर्वांत मोठे आक्रमण आहे. ‘युद्धबंदी वाढवण्याच्या चर्चेत कोणतीही महत्त्वपूर्ण प्रगती न झाल्याने आक्रमण करण्याचा आदेश देण्यात आला’, अशी माहिती पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिली. या आक्रमणावर आतंकवादी संघटना हमासने चेतावणी देतांना म्हटले की, ‘गाझामध्ये इस्रायलची नवीन आक्रमणे युद्धबंदीचे उल्लंघन असून त्यामुळे ओलिसांचे जीवन धोक्यात येऊ शकते.’ हमासकडे अजूनही इस्रायलचे २४ जिवंत ओलिस आहेत.
इस्रायलने बुरेजी परिसरातील निर्वासित छावण्यांवर आक्रमण केले. विस्थापित पॅलेस्टिनींनी एका शाळेत आश्रय घेतला होता; त्या शाळेलाही लक्ष्य करण्यात आले. या आक्रमणापूर्वी इस्रायलने गाझाला अन्न, औषध, इंधन इत्यादींचा पुरवठादेखील थांबवला होता. यामुळे गाझामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सीरिया आणि लेबनॉन येथेही आक्रमणे !
इस्रायलने लेबनॉन आणि सीरिया या देशांमध्ये हवाई आक्रमण केले. या आक्रमणांमध्ये किमान १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
आक्रमणापूर्वी इस्रायलने अमेरिकेशी केली होती चर्चा !
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या प्रसारमाध्यम सचिव कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, इस्रायलने गाझावरील आक्रमणाविषयी ट्रम्प प्रशासनाशी चर्चा केली होती. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, अमेरिका आणि इस्रायल यांच्यावर दहशत निर्माण करण्याची किंमत हमास, हुती आणि इराण यांना चुकवावी लागेल. सर्व काही नष्ट होईल.