चीनमध्ये भ्रमणभाष वापरणार्‍यांची संख्या अचानक २ कोटींनी घटली

कोरोनामुळे मरणार्‍यांची संख्या यामुळे अधिक असल्याची शंका

नवी देहली – चीनच्या वुहान शहरातून चालू झालेल्या कोरोनामुळे जगभरात ३ लाख ७९ सहस्र ८० जण बाधित झाले आहेत, तर १६ सहस्र ५२४ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये ३ सहस्र २७० जणांचा मृत्यू झाला आहे; मात्र ही संख्या अल्प असल्याचे आता म्हटले जात आहे. ‘गेल्या ३ मासांमध्ये चीनमध्ये भ्रमणभाष वापरणार्‍यांची संख्या २ कोटींपेक्षा अधिक संख्येने घटली आहे’, असा दावा अनेक भ्रमणभाष आस्थापनांनी केला आहे. यावरून चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या अधिक असल्याचा तर्क लावण्यात येत आहे.

चीनमधील ‘सॅनफोर्ड सी. बर्नस्टीन अँड कंपनी’चे विश्‍लेषक ख्रिस लेन यांनी म्हटले की, चीनमधील अनेक कर्मचार्‍यांकडे आस्थापनांकडून ‘सिम कार्ड’ देण्यात आले आहे; मात्र कोरोनामुळे विविध आस्थापने बंद असल्यामुळे कर्मचारी ते ‘सिम कार्ड’ वापरत नाहीत. त्यामुळे भ्रमणभाष वापरणार्‍यांची संख्या न्यून झाल्याचे दिसून येत आहे.