
नवी देहली – चीनवर विश्वास ठेवता येत नाही, असे विधान भारताचे सैन्यदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी येथे एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले.
जनरल द्विवेदी यांनी असेही म्हटले की, युद्ध कोणत्याही देशाच्या हिताचे नाही; परंतु जर युद्धाची परिस्थिती उद्भवली, तर भारतीय सैन्य रणनीती आणि शक्ती यांनुसार पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर देण्यास सिद्ध आहे.
जनरल द्विवेदी म्हणाले की, भारतीय सैन्य वेगाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे. भारतीय सैन्य ड्रोन तंत्रज्ञानासह नवीन सैनिकी क्षमतांवर सतत काम करत आहे.
भारताकडे असे प्रगत ड्रोन आहेत, जे एके-४७ रायफल चालवू शकतात आणि क्षेपणास्त्रे डागू शकतात. जर चीनकडून ड्रोन आक्रमण झाले, तर भारतही तोडीसतोड प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
भारत-चीन सीमेवरील परिस्थिती सामान्य !
वर्ष २०२० मध्ये पूर्व लडाखमधील देपसांग आणि देमचोक भागात भारतीय अन् चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतरच्या परिस्थितीविषयी सैन्यदल प्रमुख द्विवेदी म्हणाले की, आता परिस्थिती सामान्य आहे. जेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हा दोन्ही देशांचे सैन्य संवादाद्वारे समस्या सोडवतात, जेणेकरून शांतता राखली जाईल.
पाकिस्तानविरोधात भारतीय सैन्याला नेहमीच सक्रीय रहावे लागेल !
पाकिस्तानविषयी सैन्यदल प्रमुख म्हणाले की, आतंकवाद रोखण्यासाठी पाक कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही. यामुळे भारतीय सैन्याला नेहमीच सक्रीय रहावे लागेल. जम्मू-काश्मीरमध्ये जिथे पूर्वी आतंकवादाचा धोका होता, आता तिथे पर्यटन भरभराटीला येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांवर सैन्याने अनेक यशस्वी कारवाया केल्या आहेत, ज्यामुळे या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य निर्माण झाले आहे.
संपादकीय भूमिकाहे आता देशातील प्रत्येक नागरिकाला ठाऊक झाले आहे. केवळ भारतीयच नाही, तर जगाला हे ठाऊक आहे की, चीन विश्वासपात्र देश नाही ! |