Xi Jinping : अमेरिकेसमवेत कोणत्याही युद्धासाठी चीन सज्ज ! – जिनपिंग

बीजिंग (चीन) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी चीनच्या विरोधात ‘टॅरिफ वॉर’ (कर शुल्क युद्ध) चालू केले आहे. अमेरिकेने चिनी वस्तूंच्या आयातीवर २० टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. त्याला प्रत्युत्तर देतांना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे की, जर अमेरिकेला युद्ध हवे असेल, मग ते ‘टॅरिफ’ युद्ध असो, व्यापार युद्ध असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचे युद्ध असो, चीन शेवटपर्यंत लढण्यास सिद्ध आहे. अमेरिकेच्या संसदेत संयुक्त भाषणात डॉनल्ड ट्रम्प यांनी चीन आणि भारत यांसह अनेक देशांवर परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली होती.

१. अमेरिकेने ‘टॅरिफ’ (कर शुल्क) वाढवून चीनवर दबाव आणण्याचा आणि त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘तो आम्हाला साहाय्य केल्याविषयी शिक्षा करत आहे. यामुळे अमेरिकेची ‘फेंटानिल समस्या’ (फेंटानिल हे वेदनानाशक औषध) सुटणार नाही, तसेच उभय देशांमधील अमली पदार्थविरोधी संवाद आणि सहकार्य कमकुवत होईल’, असेही जिनपिंग म्हणाले.

२. चीनने डॉनल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांच्या विरोधात अमेरिकेला चेतावणी दिली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, धमकावणे हा चीनशी व्यवहार करण्याचा योग्य मार्ग नाही.