Pakistan Fighter Jet Fuel Tank Drop : पाकिस्तानने चीनकडून घेतलेले लढाऊ विमान उडत असतांना खाली पडली इंधनाची टाकी !

लाहोर (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या वायूदलाचे विमान उड्डाण करत असतांना  विमानाची इंधन टाकी आकाशातून भूमीवर पडली. ही घटना पाकच्या पंजाब प्रांतातील सरगोधा येथे घडली. येथे पाकच्या वायूदलाचे तळ आहे. विमानाच्या इंधनाची टाकी पडल्यामुळे अनेक गुरे घायाळ झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. पाकिस्तानी वायूदलाने हे लढाऊ विमान चीनकडून घेतले होते. चीनने हे विमान अत्यंत शक्तीशाली लढाऊ विमान असल्याचा दावा करत पाकला विकले होते.

१. यापूर्वी एप्रिल २०२३ मध्ये रावळपिंडीतील डोंगराळ भागात पाकिस्तानी वायूदलाच्या लढाऊ विमानाची इंधन टाकी पडली होती. वर्ष १९९७ मध्येही कराचीतील एका निवासी भागात विमानाच्या इंधनाची टाकी कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानी वायूदलाच्या विमानांच्या तांत्रिक व्यवस्थेविषयी यापूर्वीही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

२. चीन त्याचे सर्वांत आधुनिक लढाऊ विमान ‘जे-३५’ पाकिस्तानला देणार आहे; परंतु आता एका विमानाची इंधन टाकी पडल्यामुळे पाकिस्तान पुन्हा चीनच्या विमानावर विश्वास ठेवणार का ?, हा प्रश्न आहे.

संपादकीय भूमिका

चीनच्या वस्तूंची गुणवत्ता अत्यंत हलक्या दर्जाची असते, याचा अनुभव सर्व देशांनी अनेक वेळा घेतला आहे. नेपाळने चीनकडून घेतलेली विमाने भंगारात द्यावी लागत आहेत. पाकवरही हीच स्थिती येणार आहे. यातून तंत्रज्ञानात चीनची पात्रता आणि विश्वासार्हता किती आहे ?, हे लक्षात येते !