रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सूर्योदयाच्या मंगलसमयी गुढीपूजन !

रामनाथी (गोवा)

हिंदु नववर्षारंभानिमित्त म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथील सनातनच्या आश्रमात गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सूर्योदयाच्या वेळी मंगलमय वातावरणात विधीवत्  गुढीपूजनानंतर पंचांगस्थ गणपतिपूजन आणि नूतन संवत्सरफलश्रवण (नवीन वर्ष कसे असेल, याची ज्योतिषशास्त्रदृष्ट्या माहितीचे श्रवण) करण्यात आले. गुढीचे पूजन सनातन पुरोहित पाठशाळेचे पुरोहित श्री. चैतन्य दीक्षित यांनी केले. या वेळी ‘हे ब्रह्मदेवा, तुम्हीच आम्हा सर्व साधकांना साधना करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी शक्ती, बुद्धी, चैतन्य आणि आध्यात्मिक बळ द्या’, अशी प्रार्थना करण्यात आली.

गुढीपूजन करतांना श्री. चैतन्य दीक्षित

देवद (पनवेल)

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेचा मंगलदायी दिवस म्हणजे सर्वांसाठी चैतन्य आणि उत्साह यांची पर्वणी ! यंदाच्या गुढीपाडव्याला (२५ मार्चला) येथील सनातनच्या आश्रमात सूर्योदयाच्या मंगलसमयी गुढी उभारण्यात आली. सनातनचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. अविनाश गिरकर यांनी भावपूर्ण गुढीपूजन केले, तर श्री. अनिल कुलकर्णी यांनी पूजाविधी सांगितला. सूर्यास्ताच्या वेळी भावपूर्ण पूजा करून गुढी उतरवण्यात आली.