‘रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम’ हे देवाचे निर्गुण आणि सगुण रूप आहे. त्याच्या अस्तित्वामुळे जिज्ञासूंच्या वृत्तीमध्ये कसा पालट होतो ? आश्रम पहाण्याचे महत्त्व किती आहे ?’, हे मला देवाने काही प्रसंगांतून मनावर बिंबवले. ते येथे दिले आहेत.
१. एका कारखानदारांच्या व्यावसायिक दृष्टीकोनात पालट होऊन साधनेचा दृष्टीकोन सिद्ध होणे
एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पहाण्यासाठी एक आयुर्वेदीय उत्पादक कारखानदार आले होते. आश्रम पाहून झाल्यानंतर आम्ही चर्चा करण्यासाठी बसलो.

तेव्हा मी पाहुण्यांना विचारले, ‘‘तुम्हाला आधी एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सर्व आश्रम पाहिलात. तुमची आश्रमाविषयी प्रतिक्रिया ऐकायची आहे. काय शिकायला मिळाले ?’’ तेव्हा ते कारखानदार म्हणाले, ‘‘मी खर सांगतो. मी इथे आलो. तेव्हा वैयक्तिक विचार घेवून आलो होतो. आमच्याकडे दिवाळीचे उटणे चांगले आहे. ‘तुमच्याकडेही ते आहे’, हे मला ठाऊक आहे. ‘तुमचा प्रसार भरपूर असल्याने, आमच्याकडून तुम्ही उटणे विकत घ्यावे’, या हेतूने आम्ही आलो होतो; पण तुमचा आश्रम पाहिल्यावर माझ्या विचारांत पालट झाला. ‘आता तुमच्याशी व्यवहार कसा करू ?’ आश्रम पाहूनच मी प्रभावित झालो आणि माझे विचार पालटले. ‘आता मीच तुम्हाला काय साहाय्य करू शकतो ?’, ते सांगा. आमचा आयुर्वेदीय कारखाना बाराही मास तुमच्यासाठी उघडा आहे. तुम्हाला कोणतेही आयुर्वेदीय प्रयोग करायचे असतील, तर आम्ही तुम्हाला निश्चित साहाय्य करू. आता ‘मीच काय करायला पाहिजे ?’, ते सांगा.’’
यावरून मला ‘आश्रम हे देवाचेच रूप आहे. त्याच्या केवळ दीड घंट्याच्या सत्संगाने नवीन आलेल्यांशी काहीही न बोलता त्यांच्यात पालट (परिवर्तन) होत आहे. ते देवामुळेच होत आहेत. साधकांचा त्यामध्ये कुठल्याही प्रकारे तीळमात्रही कर्तेपणा नसतो’, हे शिकायला मिळाले.
२. केवळ दीड घंट्यात ‘मी पूर्णपणे तुमचा झालो’ असे एका जिल्हाधिकार्यांनी सांगणे
काही दिवसांपूर्वी एक जिल्हाधिकारी रामनाथी आश्रम पहायला आले होते. त्यांचा संस्थेशी पुष्कळ परिचय होता, असे नाही. आश्रम पाहिल्यावर पू. पृथ्वीराज हजारे (सनातनचे २५ वे व्यष्टी संत, वय ६६ वर्षे) यांनी त्यांना विचारले, ‘‘आश्रम पाहून तुम्हाला काय वाटले ?’’
याचे उत्तर ते वीस मिनिटे देत होते. ‘प्रत्येक विभागातून मी काय शिकलो ?’, हे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘स्वच्छता, नियोजन, सादरीकरण, पुष्कळच छान आहे. तुम्ही नोंदी छान ठेवल्या आहेत.’’ स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले, ‘‘मला हे आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना (आय.एस.ओ.) दर्जाचे आहे’, असे वाटते. तुमचे निरीक्षण अफाट आहे. आजपासून मला तुमचा समजा आणि तुम्ही सांगा की, आता मी काय करायला हवे ? मी जिल्हाधिकारी असल्यामुळे तुमच्या समवेत येऊ शकत नाही; पण तुम्ही सांगा की, मी काय साहाय्य करू शकतो.’’
मी त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही आश्रम पुष्कळच मनापासून पाहिलात.’’ त्यानंतर माझ्या मनात पुढील विचार आले, ‘एक जिल्हाधिकारी केवळ दीड घंट्यात आश्रम पाहून असे म्हणतात, ‘मला आजपासून तुमचा समजा आणि मी काय करू शकतो ?’, ते मला सांगा.’ असे शब्द ऐकायला काही मास किंवा वर्ष लागतात. दीड घंट्यामध्ये ती व्यक्ती पूर्णपणे पालटून जाते. मनामध्ये पालट होऊन ती तुमचीच होऊन जाते.’ यातून ‘आश्रम पहाण्याचे महत्त्व किती आहे !’, असे मला शिकायला मिळाले. त्यासाठी गुरुदेवांप्रती कोटी कोटी कृतज्ञता !’
– श्री. धनंजय हर्षे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२५)