अमेरिका, चीन, इस्रायल आणि रशिया यांच्यानंतर भारताकडे ‘लेझर’ शस्त्र
कुर्नूल (आंध्रप्रदेश) – भारताने ‘लेझर’वर आधारित शस्त्रांची यशस्वी चाचणी करून तो अमेरिका, चीन, इस्रायल आणि रशिया यांच्या पंक्तीत बसला आहे. ही चाचणी कुर्नूल येथील ‘नॅशनल ओपन एअर रेंज’ येथे करण्यात आली. ३० किलोवॅटच्या या लेझर-आधारित ‘डायरेक्टेड एनर्जी वेपन एम्के-४ (ए)’ या शस्त्राद्वारे काही सेकंदात शत्रूचे ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि पाळत ठेवणारे ‘सेन्सर’ नष्ट करता येऊ शकतात. हे शस्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् ‘डी.आर्.डी.ओ.’, म्हणजेच डिफेंस रिसर्च एण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन’कडून विकसित करण्यात आले आहे.
लेझर प्रणाली कशी कार्य करते?
जेव्हा रडार किंवा त्याच्या अंगभूत ‘इलेक्ट्रो-ऑप्टिक’ प्रणालीद्वारे लक्ष्य शोधले जाते, तेव्हा हे लेझर शस्त्र प्रकाशाच्या वेगाने त्यावर आक्रमण करू शकते आणि लेझरद्वारे ते नष्ट करू शकते. या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला कोणताही दारूगोळा किंवा रॉकेट यांचा वापर करण्याची आवश्यकता नाही; ते केवळ प्रकाशाने आक्रमण करते. ते एकाच वेळी ड्रोन आक्रमणांचा समूह नष्ट करू शकते. मूक ऑपरेशन, म्हणजे आवाजाविना आणि धूराविना लक्ष्य नष्ट करते.