Vitthal-Rukmini Temple In London : लंडन येथे उभारणार जगातील सर्वांत मोठे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर !

  • पंढरपूर ते लंडनपर्यंत २२ देशांतून जाणार भव्य दिंडी

  • ७० दिवसांत १८ सहस्र कि.मी. प्रवास !

नागपूर – लंडन येथे विठ्ठल-रुक्मिणीचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. या निमित्ताने १५ एप्रिल या दिवशी पंढरपूर ते लंडनपर्यंत जगातील सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे.

ही दिंडी १६ एप्रिल या दिवशी नागपूर येथे पोचणार आहे. सायंकाळी ५ वाजता बजाजनगरमधील ‘विष्णूजीकी रसोई’ येथे पालखीतील श्री विठ्ठलाची मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाणार आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शेफ विष्णु मनोहर यांनी दिली. १८ एप्रिल या दिवशी भारतातून निघणारी ही दिंडी नेपाळ, चीन, रशिया आणि युरोपसह २२ देशांतून प्रवास करणार आहे.

१. विष्णु मनोहर आणि एल्.आय.टी विद्यापिठाचे प्रधान सल्लागार मोहन पांडे हे मंदिर समितीचे सदस्य असून भारतातील समन्वयक म्हणून काम पहाणार आहेत.

२. विष्णु मनोहर यांच्या मते, परदेशात इस्कॉन, अक्षरधाम आणि बालाजी मंदिरे आहेत; मात्र समृद्ध संत परंपरा असलेले श्री विठ्ठल मंदिर नाही.

३. मोहन पांडे यांनी सांगितले की, श्री विठ्ठलाच्या पादुका थेट विमानाने नेता येणे शक्य असले, तरी वारकरी परंपरेप्रमाणे पायी प्रवास करण्याचे ठरवले आहे. दिंडी ७० दिवसांत १८ सहस्र किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या उपक्रमासाठी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि चैतन्य उत्पात यांनी सहकार्य केले आहे.