काडवली (खेड) येथे कोकणातील पहिली वारकरी शाळा बांधणार !

विद्यार्थ्यांना, निर्व्यसनी, सुसंस्कृत आणि सजग नागरिक बनवण्याचा श्री गुरुमाऊली सामाजिक सेवा संस्थेचा ध्यास  

खेड – वारकरी परंपरेचा गाढा वारसा कोकणातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने तालुक्यातील काडवली गावात कोकणातील पहिली वारकरी शाळा बांधण्यात येणार आहे. या शाळेच्या स्थापनेचा प्रारंभ श्री गुरुमाऊली सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राकेश मोरे (आंबडस) यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासमवेत आध्यात्मिक आणि संगीत शिक्षण दिले जाणार आहे.

आजच्या काळात लहान वयातच अनेक मुले व्यसनाधीन होत असल्याचे वास्तव समोर येते. अशा पार्श्वभूमीवर बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्माचे बीज रोवण्याची आवश्यकता ओळखून ही शाळा उभारली जात आहे. संस्कृती आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण देणे, हा या संस्थेचा मुख्य हेतू आहे. श्री गुरुमाऊली संस्थेने यासाठी काडवली येथे ५ वर्षांपूर्वीपासून प्रयत्न चालू केले होते. आता २४ गुंठे भूमी संपादन केली असून लोकसहभागाच्या बळावर हे स्वप्न साकार करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

प्रतिकात्मक चित्र

या शाळेतील विद्यार्थ्यांना पारंपरिक आणि आधुनिक शिक्षणाचा संगम साधत, मृदंग, तबला, हार्मोनियम, गायन, भजन, कीर्तन, संगणक प्रशिक्षण, सूत्रसंचालन आणि संवाद कौशल्य यांचेही शिक्षण दिले जाणार आहे. शाळेचा हा प्रकल्प जनतेच्या सहकार्याने उभा रहाणार असल्यामुळे, दानशूर व्यक्तींनी या कार्यासाठी उदारहस्ते साहाय्य करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

कोकणातील विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षणासाठी इतरत्र जाण्याची आवश्यकता नाही ! – राकेश मोरे

कोकणातील तरुण पिढीला वारकरी संप्रदायाचे सखोल ज्ञान मिळावे, त्यांच्यात परमार्थाचे बोधप्रद विचार रुजावेत, याच हेतूने काडवली येथे ही वारकरी शिक्षण संस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कोकणातील विद्यार्थ्यांना या शिक्षणासाठी दूर जाण्याची आवश्यकता भासणार नाही.