पोलिसांनी श्रीरामनवमी मिरवणूक औरंगाजेबाच्या कबरीसमोरून जाण्यास घातली बंदी !

  • खुलताबाद (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथील घटना

  • कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचे दिले कारण

खुलताबाद (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – श्रीरामनवमीनिमित्त गेली २५ वर्षे खुलताबाद शहरातून निघणार्‍या रामरथ मिरवणुकीस यंदा औरंगजेबाच्या कबरीसमोरून जाण्यास बंदी घालण्यात आली. औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, या भीतीपोटी पोलिसांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे प्रतिवर्षी अनुमाने अडीच किलोमीटर अंतराची रामरथाची मिरवणूक यंदा केवळ दीड किलोमीटर अंतरापर्यंतच निघाली, तसेच प्रतिवर्षी अनुमाने ७ घंटे चालणारी मिरवणूक यंदा निम्म्या म्हणजे अनुमाने साडेचार घंट्यांतच आटोपती घ्यावी लागली.

१. ‘पोलिसांच्या या निर्णयामुळे गेल्या २५ वर्षांची परंपरा खंडित झाली आहे’, असे गावकर्‍यांनी सांगितले.

२. या वर्षी बंदूकधारी पोलिसांच्या बंदोबस्तात मोठ्या आळीपासून ते लहान आळीपर्यंतच मिरवणूक काढण्यात आली.

३. या मिरवणुकीत तालुक्यातील ८ गावांतील अनुमाने १० सहस्रांहून अधिक रामभक्त सहभागी व्हायचे. यंदा मात्र १ सहस्र रामभक्त होते. या वर्षी ‘डीजे’लाही (मोठा आवाज करणार्‍या ध्वनीवर्धाक यंत्रणेलाही) अनुमती नाकारली होती.

४. सायंकाळी ७ वाजता चालू झालेल्या रामरथाच्या मिरवणुकीचा रात्री ११.३० वाजता समारोप झाला. ही मिरवणूक रात्री ९.३० वाजताच थांबवण्यास पोलिसांनी सांगितले; परंतु राजकीय नेते-गावकरी यांनी आग्रह केल्यामुळे ती अंततः रात्री ११.३० वाजेपर्यंत चालली.

पोलिसांनी सांगितले म्हणून मार्ग पालटला !

खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वाद चालू आहे. त्यामुळे छोट्या स्वरूपात मिरवणूक काढण्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (असे मुसलमानांना त्यांच्या सणांच्या वेळी सांगण्याचे धाडस पोलीस करतात का ? – संपादक) त्यामुळे भद्रा मारुति मंदिर ते लहान आळी अशीच मिरवणूक काढली होती, असे ‘श्री भद्रा मारुति संस्थान’चे अध्यक्ष श्री. मिठ्ठू बारगळ यांनी सांगितले.

शांतता समितीच्या बैठकीत झाला निर्णय !

‘औरंगजेबाच्या कबरीवरून वाद चालू आहे. शांतता समितीच्या बैठकीत ग्रामस्थांनीच पुढाकार घेत श्रीरामनवमीच्या मिरवणुकीचा मार्ग पालटला. या ठिकाणी रस्त्याचे कामही चालू आहे’, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी कुठलीही अनुमती नाकारली नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली; परंतु कबरीकडे जाणार्‍या तीनही मार्गावर बॅरिकेड्स (अडथळे) लावून पोलीस तैनात करण्यात आले होते. (एकीकडे अनुचित प्रकार घडेल म्हणून मिरवणूक कबरीसमोरून जाण्यास प्रतिबंध करायचा आणि दुसरीकडे शांतता समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे सांगून हिंदूंची दिशाभूल करायची, पोलिसांचा हा दुटप्पीपणा नव्हे का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • कायदा आणि बिघडू नये, यासाठीच पोलिसांची नियुक्ती केली जाते. असे असतांना ते बिघडण्याचे कारण देणे हे पोलिसांनी दायित्व झटकण्याचा प्रकार आहे !
  • खुलताबाद भारतात कि पाकिस्तानात आहे ? आज कबरीसमोरून मिरवणुकीला बंदी घालणार्‍या पोलिसांनी उद्या धर्मांध मुसलमानांच्या भीतीमुळे संपूर्ण मिरवणुकीवर बंदी घातल्यास हिंदूंना आश्चर्य वाटणार नाही !
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असे होणे संतापजनक होय !