‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात कु. अपाला औंधकर यांना शिकण्यासाठी बसायला सांगितले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर आणि अपाला यांच्यात झालेला संवाद येथे दिला आहे.

१. पाण्याचा नळ बाहेरील सर्व धूळ स्वच्छ करत असणे; मात्र स्वतःवरील धूळ स्वच्छ करू शकत नसणे आणि साधकांना नळाप्रमाणे नाही, तर पाण्याप्रमाणे बनायचे असणे (स्वतः कृतीत आणून नंतर इतरांना सांगायचे असणे)
कु. अपाला औंधकर : गुरुदेव, आपण पाण्याचा नळ चालू केल्यावर त्यातून पाणी येते आणि नळाच्या पाण्याने आपण जागा स्वच्छ करतो; मात्र नळावर असलेली धूळ नळ स्वच्छ करू शकत नाही. ते अन्य कुणाला तरी करावे लागते. आपल्याला नळासारखे बनायचे नाही. आपण इतरांना दृष्टीकोन देतो; मात्र आपण ते दृष्टीकोन कृतीत आणतो का ? ‘आपण दृष्टीकोन कृतीत आणायचे आणि नंतरच इतरांना सांगायचे’, हे सूत्र मला नळाकडून शिकायला मिळाले.
परात्पर गुरु डॉ. आठवले : आपण नळ बनायचे कि पाणी बनायचे ?
कु. अपाला औंधकर : पाणी.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांमधील भाव जाणत असणे आणि साधकांनी कोणत्याही भाषेत केलेले आत्मनिवेदन साधकांमधील भावामुळे त्यांच्यापर्यंत पोचत असणे (आपले बोलणेच भावपूर्ण असायला हवे.)
कु. अपाला औंधकर : गुरुदेव, तुम्ही शब्दातीत (शब्दांच्या पलीकडे) आहात. आम्ही मराठी भाषिक आहोत. आम्ही तुम्हाला मराठी भाषेत आत्मनिवेदन करतो. तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषा येतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले : परंतु तुम्ही कन्नड भाषेत बोललात, तर मला समजणार नाही.
कु. अपाला औंधकर : तेच शिकायला मिळाले की, ‘आपले विदेशातील साधक त्यांच्या मातृभाषेतून तुम्हाला आत्मनिवेदन करतात, कुणी तमिळ भाषेत करतात, ते तुमच्यापर्यंत कसे पोचते ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : आम्ही मोठे (लोक) काय बोलतो ? यांच्याकडून आपल्याला किती शिकायला मिळते ना ?
कु. अपाला औंधकर : अन्य भाषिक साधकांनी तुम्हाला केलेले आत्मनिवेदन तुमच्यापर्यंत त्या साधकांमधील तुमच्या प्रतीच्या भावामुळे पोचते. तुम्ही भाषा किंवा शब्द यांत अडकत नाही. तुम्हाला साधकांमध्ये ‘भाव’ असणे अपेक्षित आहे. सर्वत्र जे साधक आहेत किंवा जे मराठी भाषिक नाहीत, त्या सर्वांचे आत्मनिवेदन तुमच्यापर्यंत त्यांच्यातील भावामुळे पोचते. आपली भाषाच ‘भाव’ असायला हवी.’ (आपले बोलणेच भावपूर्ण असायला हवे.)
– कु. अपाला औंधकर, फोंडा, गोवा.