
१. श्री गणेशमूर्ती विसर्जनच्या निमित्ताने सदनिकेत असलेल्या कार्यक्रमात प्रवचन करण्याचे नियोजन होणे; परंतु प्रवचनाच्या आदल्या दिवशी घडलेल्या एका प्रसंगामुळे मन भावनाशील होऊन ‘कार्यक्रमाला जाऊ नये’, असा विचार मनात येणे
‘१५.९.२०२४ या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जनच्या निमित्ताने आम्ही रहात असलेल्या संकुलात पूजेचे आयोजन करण्यात आले होते. याचे औचित्य साधून ‘गणेशचतुर्थीचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व’ या विषयावर मी प्रवचन करणार होते; परंतु आदल्या दिवशी एक प्रसंग घडल्यामुळे ‘प्रवचन करू नये’, असा विचार माझ्या मनात येऊ लागला, तसेच मला कंबरदुखीचा त्रासही होत होता; परंतु मी माघार घेण्यास सिद्ध नव्हते; कारण प्रवचन करण्याचे आधीच नियोजित होते, तसेच मलाही विषय मांडण्याची तीव्र इच्छा होती. ‘मला या विचारातून बाहेर पडता येऊ दे’, अशी मी श्रीकृष्णाच्या चरणी शरणागतीने प्रार्थना करू लागले. दुसर्या दिवशीही माझ्या मनात प्रवचन न करण्याचेच विचार येत होते. मी विनाकारण भावनाशील झाले होते आणि त्यामुळे ‘कार्यक्रमाला जाऊ नये’, असे मला वाटत होते.

२. प्रवचनाच्या दिवशीही मनातील विचार न्यून न झाल्याने दायित्व असलेल्या साधिकेशी बोलणे आणि त्यांनी मनातील विचार न्यून होण्यासाठी काही उपाय करण्यास सांगणे
सायंकाळी ५ वाजता प्रवचन होते आणि दुपारचे २ वाजले, तरीही माझ्या मनाचा गोंधळ चालूच होता. ‘काय करावे ?’ मला काहीच सुचत नव्हते. त्यामुळे मी माझे (सत्संग घेण्याचे) दायित्व असलेल्या साधिकेशी बोलायचे ठरवले. मी त्वरित त्यांच्याशी बोलले आणि त्यांना माझ्या मनाची स्थिती सांगितली. ‘प्रवचन घेणे, ही समष्टी सेवा असल्याने त्यात अडथळे आणण्यासाठी अनिष्ट शक्तींनी या विचारांच्या माध्यमातून आक्रमण केले असावे’, असे त्यांनी मला सांगितले. तसेच ‘तुमच्यातील ‘भावनाशीलता’ या स्वभावदोषाची तीव्रता अधिक असल्याने वरील प्रसंग घडला असावा’, असेही त्या म्हणाल्या. त्यांनी मनातील विचार न्यून होण्यासाठी मला पुढील उपाय करण्यास सांगितले.
अ. मनात येणारे विचार एका कागदावर लिहून त्याभोवती नामजपाचे मंडळ काढणे आणि तो कागद सनातन-निर्मित ग्रंथात ठेवणे.
आ. प्रवचनासाठी जातांना समवेत भगवान श्रीकृष्णाचे चित्र घेऊन जाणे.
इ. ‘तूच माझ्याकडून प्रवचनात विषय मांडून घे’, अशी श्री गणेशाला प्रार्थना करणे.
३. कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेच्या कार्याला विरोध करणार्या लोकांना पाहून भीती वाटणे, त्या वेळी ‘परात्पर गुरुदेव समोर एका आसंदीत बसून विषय ऐकत आहेत’, असा भाव ठेवणे आणि व्यासपिठावर जाऊन बसल्यावर विरोध करणारे लोक तेथून गेल्याचे लक्षात येणे
प्रवचनाची वेळ झाली होती आणि मी परात्पर गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) ‘माझ्यासमवेत रहा’, अशी प्रार्थना सतत करत होते. इतक्या मोठ्या प्रमाणातील प्रेक्षकांसमोर मी प्रथमच बोलणार असल्याने मला भीती वाटत होती. प्रेक्षकांमध्ये काही जण अध्यात्माला (सनातनला) विरोध करणारे लोक होते. त्यामुळेही मला भीती वाटत होती. प्रवचन करण्यासाठी माझे नाव पुकारण्यात आले. मी सर्व प्रेक्षकांकडे एकदा कटाक्ष टाकला आणि स्वतःला परात्पर गुरुदेवांच्या चरणी सोपवले. ‘परात्पर गुरुदेव माझ्या समोर एका आसंदीत बसले आहेत आणि ते माझा विषय ऐकत आहेत’, असा भाव ठेवून मी विषयाला आरंभ केला. त्या वेळी ‘सनातन संस्थेच्या कार्याला नेहमी विरोध करणारे लोक प्रेक्षकांमध्ये बसलेले नाहीत’, असे माझ्या लक्षात आले. वास्तविक मी प्रवचन करण्यासाठी व्यासपिठावर जात असतांना ते लोक प्रेक्षकांमध्ये बसलेले मला दिसले होते; परंतु मी व्यासपिठावर आसंदीत जाऊन बसले, तेव्हा ते मला दिसले नाहीत. त्यामुळे मी अधिकच निश्चिंत झाले.
४. प्रवचनातील विषय निर्भयपणे मांडता येणे
पूर्ण प्रवचन होईपर्यंत मला एकदाही भीती वाटली नाही. विषय मांडतांना माझा आवाजही नेहमीप्रमाणे स्पष्ट होता. प्रवचनाचा मी फारसा सराव केला नव्हता, तरीही बोलतांना माझ्या आवाजातील चढ-उतार व्यवस्थित होते. प्रवचन झाल्यानंतर काही जणांनी मला सांगितले, ‘‘गणेशचतुर्थीच्या उत्सवात होत असलेल्या अयोग्य प्रथांविषयी सांगतांना तुमच्या आवाजात कणखरपणा होता, तर गणेशचतुर्थीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि लाभ सांगतांना तुमचा आवाज शांत होता.’’
५. प्रवचन संपल्यानंतर प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद प्रवचन झाल्यानंतर मी पूर्णतः भावस्थितीत होते. उपस्थित काही प्रेक्षकांकडून मला पुढील अभिप्राय मिळाले.
अ. ‘इतके सर्व तुम्हाला कसे ठाऊक ?’, असे काही जण विचारत होते.
आ. ‘एखादा उत्सव साजरा करतांना अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोन कसा असावा ?’, हे कळल्यामुळे अनेकांना आनंद झाला होता.
इ. एका ७ वर्षांच्या मुलीने सांगितले, ‘तुमचा आवाज पुष्कळ छान आहे आणि प्रवचनही चांगले झाले.’
ई. काहींनी सांगितले, ‘तुमचा आत्मविश्वास पहाता ‘तुम्ही प्रथमच प्रवचन करत आहात, असे वाटत नाही.’
उ. काहींनी प्रवचन ऐकून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सनातन-निर्मित ग्रंथांची मागणी केली.
ऊ. माझे यजमान म्हणाले, ‘‘तू इतका वेळ विषय मांडणार आहेस, हे मला ठाऊक नव्हते.’’ नंतर यजमानांनी प्रवचनाच्या विषयाची प्रत (स्क्रीप्ट) वाचण्यासाठी मागितली.
६. परात्पर गुरुदेवांवरील श्रद्धा वाढणे
या सर्व अनुभूतींमुळे माझी भावजागृती झाली. ‘कोणत्याही परिस्थितीत परात्पर गुरुदेव माझ्याकडून साधना करून घेणार आहेत’, अशी दृढ श्रद्धा माझ्यात निर्माण झाली.
‘हे परात्पर गुरुदेव, गणेशचतुर्थीच्या कार्यक्रमात मला प्रवचन करण्याची संधी देऊन माझ्याकडून ही सेवा करून घेतल्याबद्दल आणि मला या सेवेतील आनंद अनुभवण्यास दिल्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’
– सौ. मृगनयनी कुलकर्णी, बेंगळुरू, कर्नाटक. (ऑक्टोबर २०२४)
|