पंजाबच्या अमृतसरमध्ये हिंदूंच्या ठाकुरद्वार मंदिरावर हातबाँबचा स्फोट घडवण्यात आला. आतापर्यंत खलिस्तानी कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांत हिंदूंच्या मंदिरांच्या भिंतींवर काळे फासत होते किंवा भारतविरोधी घोषणा लिहीत होते. पंजाबमध्ये मात्र पहिल्यांदाच मंदिरावर अशा प्रकारचे आक्रमण करण्यात आले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली, तर चकमकीत एका आक्रमणकर्त्याला ठार केले. हे आरोपी बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना बब्बर खालसाशी संबंधित आहेत. त्यांना पाकिस्तानातील त्यांच्या हस्तकाकडून सूचना दिल्या जात होत्या. देशात गेली अनेक दशके खलिस्तान म्हणजे शिखांसाठी वेगळा देश बनवण्याची मागणी केली जात आहे. पंजाब राज्यासह हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश यांचा काही भाग मिळून खलिस्तान करण्याची मागणी खलिस्तानी करत आहेत. त्याला पाकिस्तानची फूस आहे, हे उघड सत्य आहे. १९८० च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य करत त्यांचा नरसंहार केला होता. नंतर हा आतंकवाद मोडून काढण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून तो पुन्हा डोके वर काढण्याचा प्रयत्न करत आहे. कॅनडातील खलिस्तानवाद्यांकडून त्याला साहाय्य करण्यात येत आहे आणि कॅनडातही त्यांच्याकडून हिंदू अन् भारतीय दूतावास यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो त्यांना पाठीशी घालत होते. ते आता पदावरून गेले, तरी नवीन आलेले पंतप्रधान काय भूमिका घेतात ?, हे पहावे लागणार आहे. अमृतसरच्या घटनेकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे; कारण हे आक्रमण बाँबद्वारे करण्यात आलेले आक्रमण होय ! पंजाब पोलिसांनी एका आरोपीला चकमकीत ठार केले, तरी त्यांची पाळेमुळे खोदून काढली पाहिजेत. आक्रमण झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यापेक्षा आधीच अशा प्रकारचे आक्रमण होणार नाही, अशी स्थिती निर्माण केली पाहिजे. ‘पंजाबचे आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर येण्यामागे खलिस्तानला आतून फूस होती’, असे म्हटले जाते. जर आम आदमी पक्षाची मानसिकता अशी असेल, तर केंद्र सरकारने तात्काळ पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे. पंजाबमध्ये हिंदु नेत्यांना लक्ष्य करून ठार केले जात आहे. ४ दिवसांपूर्वीच शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख मंगतराम राय यांची हत्या करण्यात आली. हत्या करणारे खलिस्तानी होते, असे समोर येत आहे. यापूर्वीही काही हिंदु नेत्यांना अशाच प्रकारे ठार करण्यात आले आहे. याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. खलिस्तान्यांच्या कारवाया चालू असतांना शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात एका मुसलमानाने भाविकांवर आक्रमण केले, यात ५ जण घायाळ झाले. याविषयी एकही खलिस्तानी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्यायला हवे.
भारताला यश मिळो !
खलिस्तानच्या कारवाया भारतात आणि विदेशात चालू असतांना पाकिस्तानमध्ये गेल्या ७८ वर्षांपासून बलुचिस्तानी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत आहेत. यात आतापर्यंत लाखो बलुची नागरिकांनी बलीदान दिले आहे. सध्या या लढ्याला अंतिम स्वरूप आल्याचे दिसून येत आहे. गेल्या ३ दिवसांत बलुची लोकांची सशस्त्र संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून पाकच्या सैन्यावर आक्रमण करण्यात आले. ‘या संघटनेला भारताची फूस आहे. भारत तिला सर्व प्रकारचे साहाय्य करत आहे’, असा पाकचा आरोप आहे. यापूर्वी भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकने अटक करून ते बलुचिस्तानी लोकांना कारवाया करण्यासाठी साहाय्य करत असल्याचा आरोप केला होता. अजूनही जाधव पाकच्या कारागृहात आहेत. ‘पाकिस्तान गेली काही दशके काश्मीर आणि पंजाब यांमध्ये ज्या कारवाया करत आहे, तशाच कारवाया भारताने पाकमध्येही त्याच्या विरोधात कराव्यात’, असे कोणत्याही देशभक्त भारतियाला वाटणारच; पण बलुचिस्तानचे सूत्र पूर्ण वेगळे आहे. तो एक स्वतंत्र प्रदेश होता. भारताची फाळणी झाली, तेव्हा तो पाकिस्तानमध्ये समाविष्ट नव्हता. फाळणीनंतर ज्याप्रमाणे पाकने काश्मीरवर आक्रमण करून अर्धा काश्मीर गिळंकृत केला, तसाच त्याने संपूर्ण बलुचिस्तान गिळंकृत केला. तेव्हापासून तेथील लोक लढा देत आहेत. त्या वेळी बलुचिस्तानचे सरहद्द गांधी म्हणजे खान अब्दुल गफार खान यांची आणि अन्य बलुची लोकांची इच्छा होती की, बलुचिस्तान भारताशी जोडला जावा; मात्र नेहरूंनी ते नाकारले. हा इतिहास जर भारत पालटत असेल, तर त्यात चुकीचे काय ? पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्यावर अब्दाली शेकडो मराठ्यांना पकडून अफगाणिस्तानमध्ये नेत असतांना ते बलुचिस्तानमध्ये पोचल्यावर तेथेच राहिले. त्यांचे वंशज आज बलुचिस्तानमध्ये आहेत, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताशी त्यांचे नाते निर्माण होते. पाकमधून बलुचिस्तान स्वतंत्र झाला, तर त्याचा भारताला किती लाभ होईल, हा येणारा काळच सांगू शकतो; कारण बांगलादेशाचे उदाहरण आपल्यासमोर आहे; पण आताच्या घडीला पाकला जेरीस आणणे एक शत्रूराष्ट्र म्हणून आवश्यक आहे. पाकिस्तानने भारतात विशेषतः काश्मीर आणि पंजाब येथे आतंकवादाच्या माध्यमांतून कारवाया करून भारताची जीवित आणि वित्त हानी केली, त्याला प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. केवळ बलुचिस्तानच नव्हे, तर अफगाणिस्तानला साहाय्य करून पाकला धडा शिकवण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. सध्या तालिबान ते करतच आहे. पाकिस्तानला थेट नष्ट करण्याचे धाडस कोणत्याही भारतीय शासनकर्त्याने गेल्या ७८ वर्षांत केले नाही. ‘पाकिस्तान भारताला लागलेला एक शाप आहे’, असे आतापर्यंतच्या इतिहासातून लक्षात येते. पाक नावाचा देश नसता, तर भारत आणखी पुढे गेला असता. बलुचिस्तानला भारताविषयी आणि भारतियांना बलुचिस्तानी लोकांविषयी आपुलकी आहे; मात्र खलिस्तानी शिखांना पाकविषयी किंवा मुसलमानांविषयी आपुलकी आहे का ? पाकला आणि मुसलमानांना शिखांविषयी आपुलकी आहे का ? खलिस्तानी शिखांनी भारतात खलिस्तानची मागणी केली असतांना त्यांनी पंजाबचा मोठा भूभाग पाकिस्तानमध्ये आहे, तो खलिस्तानमध्ये असावा, अशी कधीच मागणी केली नाही. तसेच मुसलमान आक्रमणकर्त्यांनी आणि फाळणीच्या वेळी मुसलमानांनी शिखांच्या ज्या हत्या केल्या, ते हे खलिस्तानी सोयीस्कर विसरत आहेत. उद्या खलिस्तान झाल्यावर हाच पाकिस्तान आणि तेथील मुसलमान शिखांच्या हत्या करतील अन् खलिस्तान गिळंकृत करतील, यात शंका नाही. त्यामुळे पाकिस्तान हा केंद्रबिंदू आहे. हा केंद्रबिंदू पुसण्यासाठी भारत प्रयत्न करतच आहे. त्याला यश मिळावे, अशीच भारतियांची अपेक्षा !
पाकिस्तानला जगाच्या इतिहासावरून नष्ट करण्यात केवळ भारताचेच नाही, तर जगाचे हित आहे, हे जगाला कळेल तो सुदिन ! |