BEL Engineer Spying For Pakistan : पाकला गोपनीय माहिती पुरवणार्‍या ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’च्या कर्मचार्‍याला अटक !

‘बेल’च्या दीप राज चंद्राला पाकसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी अटक

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’च्या (‘बेल’च्या) दीप राज चंद्रा नावाच्या कर्मचार्‍याला पाकसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. चंद्रा ‘बेल’मध्ये उत्पादन विकास आणि संशोधन केंद्रामध्ये काम करतो. चंद्रा मुळचा उत्तरप्रदेशातील गाझियाबादचा आहे. काही दिवसांपूर्वी अन्वेषण यंत्रणांनी कानपूरच्या शस्त्रास्त्र कारखान्यातील रवींद्र कुमार या कनिष्ठ कार्य व्यवस्थापकाला पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्यावरून अटक केली होती. त्याच्या चालू असलेल्या चौकशीतून अन्वेषण यंत्रणा काम करत आहे. त्या आधारेच बेंगळुरू येथे कारवाई करण्यात आली.

‘बेल’ची कोणती कागदपत्रे पाकला पुरवण्यात आली, याची माहिती मिळू शकली नाही. सध्या ‘बेल’मध्ये भारतीय वायूदलासाठी विविध प्रकारची घातक शस्त्रास्त्रे बनवण्याचे काम चालू आहे. तसेच ड्रोन आणि लढाऊ विमानेही बनवण्यात येत आहेत.

याआधी १८ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी कर्नाटकातील कारवार नौदल तळाशी संबंधित संवेदनशील माहिती पाकला पुरवल्यावरून २ व्यक्तींना अटक केली होती.

संपादकीय भूमिका

अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !