सौ. निवेदिता जोशी यांनी भावजागृतीसाठी केलेले प्रयोग आणि ते करतांना त्यांना अन् सहसाधिकांना आलेल्या अनुभूती

‘निवासस्थानावरून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेला आल्यावर मी प्रतिदिन श्रीकृष्णाला विचारायचे, ‘आज कुठला भाव ठेऊन सेवा करू ?’ तेव्हा श्रीकृष्ण मला भाव सांगत होता. त्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर मला आनंद मिळायचा. दिवसभर श्रीकृष्ण आणि गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले) यांचे अनुसंधान रहायचे. हे भावप्रयोग मी काही सहसाधिकांनाही सांगितले. त्या वेळी त्यांनाही काही अनुभूती आल्या.

श्रीकृष्ण

१. भावजागृतीसाठी केलेले प्रयोग

१ अ. श्रीकृष्णाच्या शेल्यामध्ये छोटे बालक बनून पहुडले असणे : श्रीकृष्णाचा शेला वार्‍याने हलत असल्याने आनंदाचे तरंग वातावरणात प्रक्षेपित होत आहेत. त्यामुळे मला आनंद वाटून शांत निद्रा लागत आहे. माझा ‘श्रीकृष्ण, श्रीकृष्ण’, असा जप चालू आहे.

सौ. निवेदिता योगेंद्र जोशी

१ आ. दिवसभर श्रीकृष्णाच्या गंधाचे स्मरण करणे आणि केशर अन् कस्तुरी यांचा सुगंध अनुभवणे : मी हा भावजागृतीचा प्रयोग केला. तेव्हा मी ‘श्रीकृष्णाचे ललाट (कपाळ) हे संपूर्ण जग आहे. त्यावरील गंध म्हणजे भारतमाता आहे’, असा भाव ठेवला. तेव्हा ‘भारत विश्वगुरु आहे आणि विश्वाचा गुरु श्रीकृष्ण आहे’, असा विचार माझ्या मनात आला. दुसर्‍याच दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मधून भविष्यवेत्त्यांनी ‘आगामी काळात भारत विश्वगुरु पदावर असेल’, असे भविष्य वर्तवले असल्याचे वाचनात आले. त्या वेळी अशा या ‘भारतभूमी’मध्ये जन्म दिल्याबद्दल श्रीकृष्ण आणि श्री गुरुचरणी (परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी) कृतज्ञता व्यक्त झाली.’

२. श्वासाला जोडून माझा ‘श्रीकृष्णः शरणं मम ।’ हा नामजप होत आहे

यामध्ये थोड्या थोड्या वेळाने थांबून श्वासाकडे लक्ष केंद्रित करून पाच ते सहा वेळा ‘श्रीकृष्णः शरणं मम ।’ (अर्थ – मी भगवान श्रीकृष्णाला शरण जात आहे.) हा नामजप एकाग्रतेने करण्याचा प्रयत्न करतांना मला आणि सहसाधिकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सौ. निवेदिता जोशी  : ‘श्रीकृष्णः शरणं मम ।’ हा नामजप करत असतांना माझ्या मनाला आनंद झाला. माझे मन अखंड भावावस्थेत होते. आतूनच मला ‘आता नामजप करूया’, अशी सूचना मिळून नामजपाकडे एकाग्रतेने लक्ष देऊन त्यातील आनंद अनुभवता येत होता.’

श्रीमती शॅरन सिक्वेरा  : ‘माझा ‘श्रीकृष्णः शरणं मम ।’ हा नामजप एकाग्रतेने भावपूर्ण झाला आणि माझ्या मनातील विचार न्यून झाले’, असे मी अनुभवले. ‘संध्याकाळी एका संतांची भेट होऊन त्यांच्याशी बोलता आले. हे त्या नामजपामुळे झाले’, असे मला वाटत होते.’

श्रीमती भाग्यश्री आणेकर (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६७ वर्षे), वाराणसी : ‘मी ‘श्रीकृष्णः शरणं मम ।’ हा नामजप केला. त्या वेळी मला ‘माझ्या आतमध्ये पिवळा प्रकाश पसरत आहे आणि माझे मन एकाग्र झाले आहे’, असे जाणवून मनाची स्थिरता वाढली.’

३. भावजागृतीसाठी केलेले अन्य प्रयोग

अ. कृष्णाच्या वैजयंतीमाळेचे स्मरण करणे : ‘त्या माळेचा गंध अंतर्मनापर्यंत जाऊन माझ्या अंतर्मनाची शुद्धी होत आहे’, असे जाणवले.

आ. श्रीकृष्णाचा दिव्य रथ घराच्या दाराशी येऊन उभा आहे. त्याचे मी दर्शन घेत आहे. रथाला प्रदक्षिणा घालत आहे. श्रीकृष्ण आपला हात धरून मला रथात घेत आहे. श्रीकृष्णाचा तो स्पर्श मी अनुभवत आहे.

इ. श्रीकृष्णाच्या हातात मी छोटे बालक बनून पहुडले आहे. श्रीकृष्ण माझ्याकडे खूप प्रेमाने बघत आहे. मी श्रीकृष्णाची करंगळी धरली आहे.

ई. मी छोटी बालिका असून श्रीकृष्णाच्या कडेवर आहे. श्रीकृष्ण मला मायेने, लडिवाळपणे थोपटत आहे. माझा एक हात श्रीकृष्णाच्या गळ्यात, दुसरा हात त्याच्या कुरळ्या केसांत असून माझी मान त्याच्या खांद्यावर आहे. या वेळी मी अतिशय निर्विचार स्थिती अनुभवत आहे.’

– सौ. निवेदिता योगेंद्र जोशी (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५२ वर्षे), नंदुरबार, जिल्हा नंदुरबार

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक