सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९० पासून अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू केले. त्या अंतर्गत त्यांनी ‘आनंदप्राप्तीसाठी साधना’, या विषयावर अभ्यासवर्ग घेणे, विविध ग्रंथांचे संकलन करणे, अनेक मोठी प्रवचने करणे’, असे विविध मार्ग अवलंबले आहेत. आरंभापासून ‘जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करणे आणि ‘चांगला साधक कसे व्हावे ?’, याविषयी मार्गदर्शन करणे’, हा त्यांच्या कार्याचा एकमेव उद्देश होता. ‘साधकांच्या साधनेसंबंधी अडचणी समजून घेणे आणि त्यांचे निराकरण करून उपाय सांगणे’, हे त्यांच्या कार्याचे एक अविभाज्य अंग आहे. ‘बाळ बोबडे जरी बोले, बोल जननीस ते कळे ।’, या उक्तीप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधकांच्या साधनेसंबंधी अडचणी लगेच कळतात आणि ते त्यांना अचूक उपायही सांगतात’, अशी अनुभूती अनेक साधकांनी घेतली आहे.

१५ मार्च २०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध ठिकाणी केलेल्या मार्गदर्शनातील काही निवडक सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे दिली आहेत.   

(भाग २)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा-https://sanatanprabhat.org/marathi/892760.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

४. इतरांच्या मनाला समजेल, अशी साधना सांगणे आणि शिकवणे, हे साधनेत पुढे जाण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे !

एक साधिका : मी कॉलेजमध्ये शिकवत असतांना सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण करायचे. आता संक्रांतीला वाण देतांना सनातनची उत्पादने देते. सनातन पंचांगांचे वितरण करते. अशी माझी थोडीफार सेवा होत होती. मी साधनेत आणखी पुढे जाण्यासाठी काय करायला हवे ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हे केवळ वितरण करणे झाले; पण सगळ्यात महत्त्वाचे काय ? वितरण करणे हे पैशांशी संबंधित आहे. तन, मन आणि धन असे आपण म्हणतो. मनाशी संबंधित महत्त्वाचे काय आहे ?, तर इतरांच्या मनाला कळेल अशी साधना सांगणे आणि शिकवणे. त्यांनी २ वस्तू घेतल्या याला अधिक महत्त्व नाही. सत्संग घेणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. आपले इतके साधक संत झाले आहेत. काही संत होण्याच्या मार्गावर आहेत. ते कसे ?, तर प्रत्येकजण हेच करतो. धर्मसत्संग घेतो आणि लोकांना शिकवतो. आले का लक्षात ?

५. चांगला साधक होण्यासाठी साधक, संत, गुरु जे सांगतात, तसे करणे महत्त्वाचे !

एक साधक : चांगला साधक किंवा शिष्य होण्यासाठी प्रयत्न कसे करायला हवेत ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : चांगला साधक किंवा शिष्य म्हणतो, ‘गुरूंनी सांगितले, ते मी करणार.’ त्यामुळे त्याचा मनोलय होतो. मन नष्ट होते. बुद्धीलय होतो, म्हणजे बुद्धी नष्ट होते. मग काय उरले ? शेवटी काय व्हायला पाहिजे ? आपण काही ठरवायचे नाही. साधक, संत, गुरु जे सांगतात, तसे करायचे. त्यामुळे आपण ईश्वराच्या जवळच जातो. मोक्षाच्या दिशेने आपली वाटचाल चालू होते. शरीर तर जाणारच आहे. त्याचा आपण विचारच करायचा नाही. मनुष्य जन्मात केवळ साधकच मनोलय आणि बुद्धीलय करू शकतो.

‘दुसरा म्हणेल, तसे ऐकले. त्याच्याबद्दल प्रश्न मनात नाही.’ तर त्याचे ‘का ? कशासाठी सांगतो ?’, असे काही म्हणणे नसते. समोरच्याने सांगितलेले ऐकले, तर आपला मनोलय होणार आहे. जर आपण ‘का ? आणि कसे ?’ याचाच विचार करत असलो, तर ‘आपण अजून मनाच्या पातळीवर अडकलो आहोत. चांगले साधक झालो नाही’, असे समजावे.

६. देवाप्रती आपली श्रद्धा वाढली, तर देव आपली काळजी निश्चितच घेतो !

एक साधिका : ‘पूर्वी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाच्या जवळच आमचे निवासस्थान होते. त्यामुळे नोकरीहून आल्यावर मी देवद आश्रमात सेवेला जात असे. आम्ही कोरोनाच्या काळात गावाला गेलो होतो. गावाहून आल्यावर आम्ही नवीन जागेत रहायला गेलो. मी आता जिथे रहातो, ती जागा आश्रमापासून पुष्कळ दूर आहे. त्यामुळे येण्या-जाण्याचा, म्हणजे प्रवासाचाही मला त्रास होतो. त्यामुळे माझी समष्टी साधना होत नाही. मग आता मी काय करायचे ? आश्रमाच्या जवळच आम्ही आता घर पहात आहोत. मी नोकरी करते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो; पण पुढे देव आहे ना ! देवावरची श्रद्धा वाढली की, तो बघेल असे सगळे होते.

एक साधिका : आता आमचा विचार चालला आहे, ‘आश्रमाच्या जवळच घर घ्यायचे.’ पूर्वी नोकरीनंतर मी प्रतिदिन दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत धान्याशी संबंधित सेवा करायचे. आता आमचे तेच नियोजन चालले आहे की, जवळ घर घेऊन पुन्हा सेवेला जायचे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुम्ही देवाची सेवा केली, तर तो तुमची काळजी घेणार नाही का ?

७. सर्वस्व अर्पण केल्यावर, पूर्णवेळ साधना करू लागल्यावर देव आपल्याकडे पूर्णवेळ लक्ष देतो !

एक साधिका : आता आम्हाला सेवा करायला मिळत नाही. मग तोपर्यंत आम्ही व्यष्टी साधनाच करू का ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मग जन्म फुकट जाईल. जेवढी समष्टी साधना अधिक तेवढे चांगले असते. देव समष्टीचे बघतो ना ! तो अनंतकोटी ब्रह्मांड बघतो ना ! मग ‘आपण व्यष्टी साधनाच करूया’, असे म्हटले, तर देवाशी एकरूप कसे होणार ? पूर्णवेळ साधना करणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. आम्ही अर्धवेळ साधना करतो, असे नाही. ईश्वराला आपण सर्वस्व अर्पण केले की, तो लगेच आपल्याला जवळ घेतो. अर्धवेळ साधना केली, तर ईश्वर आपल्याकडे अर्धवेळ लक्ष देईल. कळले का ? आश्रमात जे पूर्णवेळ साधना करत आहेत, ते पुढे चालले आहेत. त्यांची प्रगती होत आहे.’

८. समष्टी साधनेचे महत्त्व

८ अ. इतरांना साधना सांगून साधनेकडे वळवणे, म्हणजे समष्टी साधना !

एक साधिका : अनेकदा आम्ही विविध आश्रमांत जातो. तेथे सेवा करतो, उदा. गुरुपौर्णिमेच्या वेळेला व्यासपीठ सजवणे. तेथील लोकांना वाढण्याची सेवा करतो, तर त्या वेळेला व्यष्टी आणि समष्टी साधना होते कि केवळ समष्टी साधना होते ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ही एक प्रकारची व्यष्टी साधना होते. यातून सेवा करायची मनाला सवय लागते. समष्टी म्हणजे काय ? आपण इतरांना साधना सांगून त्यांना साधनेकडे वळवणे. तेही साधना करायला लागतात, तेव्हा ती समष्टी साधना होते.

८ आ. नामस्मरण करत सेवा केल्याने सेवा चांगली होते !

एक साधिका : जर नामस्मरण करून सेवा केली, तर ती समष्टी होते का ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : त्यामुळे आपण करत असलेली ती सेवा चांगली होते; पण ती व्यष्टी सेवाच झाली.

८ इ. ‘सगळे विश्व ईश्वराचे आहे’, असे वाटून त्याच्यासाठी काहीतरी करू लागलो की, समष्टी साधना होते !

एक साधिका : समष्टी साधनेसाठी अजून काय करायला पाहिजे ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : नुसती व्यष्टी साधना केली, तर साधक ५० – ६० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंतच येऊन थांबतो. ‘हे सगळे आपले आहे, ईश्वराचे आहे’, असा भाव त्याच्यात निर्माण झाला; ‘देवासाठी काहीतरी करायला पाहिजे’, असे वाटू लागले की, त्याची समष्टी साधना होऊ लागते. ईश्वराचा तोच विचार आहे, ‘सगळे विश्व माझे आहे. मी सगळ्यांना बघतो.’

८ ई. समष्टी साधना परिणामकारक होण्यासाठी स्वतःची व्यष्टी साधना चांगली असणे आवश्यक !

एक साधिका : नमस्कार ! सध्या कलियुगाची कुठली साधना ? नामस्मरणच ना ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : कुठचेही युग असो. सगळ्यात महत्त्व आहे व्यष्टी आणि समष्टी यांना !

व्यष्टी आणि समष्टी अशा दोन साधना असतात. व्यष्टी साधना करणे, म्हणजे मला ‘ईश्वरप्राप्ती’ आणि ‘समष्टी म्हणजे काय ?’, तर सगळ्यांना आपण पुढे घेऊन जायचे, म्हणजे आपण सगळ्यांचाच विचार करतो. आपण देवासारखा सगळ्यांना पुढे घेऊन जायचा विचार करायला लागतो. त्यामुळे ते महत्त्वाचे; पण त्यासाठी आपली स्वतःची व्यष्टी साधना चांगली पाहिजे. ती जर असली, तरच आपल्या वाणीत चैतन्य येते. आपण जे बोलतो, ते इतरांच्या मनावर परिणाम करते. त्यामुळे तेही साधना करू लागतात.

एक साधिका : म्हणून नामस्मरण अधिक करायचे ना ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो.’

(क्रमशः)


लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा –  https://sanatanprabhat.org/marathi/893428.html