पुणे येथे आरोपीच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवून घराला आग लावली !

राजगुरुनगर (जिल्हा पुणे) – मांजरेवाडी धर्म (ता. खेड) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. त्यातून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी आरोपी नवनाथ मांजरे यांच्या घरासमोरील ट्रॅक्टर अज्ञातांनी पेटवला असून घराला आग लावली होती. अग्नीशमनदलाच्या गाड्या आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. आरोपी नवनाथ मांजरे याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता, दगडाने ठेचून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह भीमा नदीत फेकून दिला होता. या प्रकरणातील आरोपीला फाशी झालीच पाहिजे, नाही तर गाव शांत बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. सध्या आरोपीच्या घरासमोर २ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करत आरोपीच्या घराला संरक्षण दिले आहे.

संपादकीय भूमिका

बलात्कार करणार्‍यांना लगेच कठोर शिक्षा न झाल्यास होणार्‍या जनतेच्या उद्रेकाचे दायित्व कुणाचे ?