कर्नाटक : डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचा शेण फासून आणि चपलांची माळ घालून केला अपमान !

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील प्रकार !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मैसुरू (कर्नाटक) – राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मैसुरू तालुक्यातील वाजमंगल गावात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला शेण फासल्याचा आणि चपलांची माळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासह गावात लावण्यात आलेले त्यांचे फलकही फाडण्यात आल्याचे समोर आले आहे. कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या वरुणा मतदारसंघातील वाजमंगल गावामध्ये हे कृत्य घडले आहे. (आपणच राज्यघटनेचे कैवारी असल्याचा आव आणणार्‍या काँग्रेसचा खरा चेहरा उघड ! – संपादक)

वाजमंगल येथील सिद्धार्थ युवक संघाने १४ एप्रिल या दिवशी बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी केली होती. या पार्श्वभूमीवर गावात लावलेले डॉ. आंबेडकर यांचे फलक आणि ‘कटआऊट्स’ फाडले गेले आणि त्यांना शेण फासण्यात आले. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

राज्यघटनेची प्रत खिशात घेऊन फिरणार्‍या काँग्रेसवाल्यांच्या राज्यात डॉ. आंबेडकर यांचा अवमान !