भाजपचा हिंदी, हिंदू आणि हिंदु राष्ट्र असा विचार ! – हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस

हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस

पुणे – इयत्ता ५ वीपासून हिंदी आणि पुढे संस्कृत अन् नंतर अन्य भाषांचा अभ्यास करता येत असतांनाही हिंदी भाषेची सक्ती कशासाठी ? हिंदी भाषेची इयत्ता पहिलीपासूनची सक्ती ही अशास्त्रीय आहे. यामागे भाजपचा हिंदी, हिंदू, हिंदु राष्ट्र अशी संकल्पना आहे, असा आरोप राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते येथील वार्तालापमध्ये बोलत होते. (काँग्रेसला पूर्वीपासून हिंदू आणि हिंदु राष्ट्र यांविषयी वावडे आहे. त्यांना धर्मांधच जवळचे वाटतात आणि हिंदु हे शत्रू ! त्यामुळे बहुसंख्य हिंदूंच्या भारतात काँग्रेसचे अस्तित्व संपत आले आहे. – संपादक) ते म्हणाले की, लहान मुलांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करणार्‍या तज्ञांनी ६ वर्षांपर्यंत शालेय अभ्यास, परीक्षा देऊ नये, असे सांगितले आहे. ३ र्‍या वर्षांपासून मुलांना के.जी., सिनीअर के.जी. करायला लावले जाते, हा व्यवसाय आहे.