नागपूर येथे आकाशातून जड धातूचा तुकडा कोसळला !

आकाशातून पडलेला जड धातूचा तुकडा

नागपूर – जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात पहाटे अमेय भास्कर बसेशंकर यांच्या घराच्या स्लॅबवर आकाशातून जड धातूचा तुकडा कोसळला. अचानक स्फोटासारखा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घराबाहेर धावत आले. या धातूचा तुकडा सुमारे ५० किलो वजनाचा, १० ते १२ मि.मी. जाडीचा आणि सुमारे ४ फूट लांबीचा आहे. हा तुकडा अर्धवट तुटलेल्या अवस्थेत असून त्यातून घराच्या स्लॅबची आणि भिंतीची किरकोळ हानी झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

धातूच्या प्राथमिक तपासणीत त्यात कोणतीही स्फोटक सामग्री नसल्याचे निष्पन्न झाले आहे; मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हा तुकडा नागपूर फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पडताळणीसाठी पाठवण्यात आला आहे. हा तुकडा उपग्रहाचा अवशेष, एखाद्या अंतराळ यानाचा भाग किंवा एखाद्या औद्योगिक यंत्रणेचा सुटलेला घटक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.