१. दूरचित्रवाणीवरील एका नृत्याचा कार्यक्रम पाहून ‘याला कलाविष्कार म्हणावे का ?’, असा प्रश्न पडणे

‘एकदा दौर्याच्या वेळी एका व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर आम्हाला दूरचित्रवाणी संचावर एक नृत्याचा कार्यक्रम पहाण्याचा योग आला. तो कार्यक्रम पाहून ‘आताची नृत्यकला किती खालच्या स्तरावर पोचली आहे’, याचे विदारक दृश्य आम्हाला पहायला मिळाले. ‘याला कलाविष्कार म्हणावे का ?’, असा आम्हाला प्रश्न पडला. या कार्यक्रमाचे परीक्षक कला क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्ती होत्या. या वेळी पाहुणे परीक्षक म्हणून आधीच्या पिढीतील २ अभिनेत्री उपस्थित होत्या.
२. पाश्चात्त्यांच्या नृत्य प्रकारांच्या प्रभावामुळे ते नृत्य असात्त्विक वाटणे
या कार्यक्रमामधे ज्या गाण्यावर कलाकार नृत्य सादर करत होते, ते गाणे वेगळेच होते आणि त्यावरील नृत्यही अगदी विचित्र असे होते. यातून सात्त्विक स्पंदने जाणवत नव्हती. ते पाहून आनंदही मिळत नव्हता. सध्या ‘जॅझ’, ‘टॅप’, ‘हिप-हॉप’, ‘चाचाचा’, अशा पाश्चात्त्य नृत्यांच्या मागे धावत आपण आपली भारतीय नृत्यकला विसरत चाललो आहोत.
३. एके काळी नावाजलेल्या दिग्गज कलाकारांकडून आताच्या पिढीला योग्य मार्गदर्शनाची अपेक्षा असतांना या कलाकारांकडून असे कार्यक्रम आनंदाने पाहिले जात असणे
एके काळी दिग्गज कलाकार असलेल्या २ अभिनेत्रींसारखे कलाकारही हे कार्यक्रम आनंदाने पहातात. ‘त्यांच्या सारख्या अनुभवी दिग्गजांकडून आताच्या पिढीला योग्य मार्गदर्शन व्हावे’, हे अपेक्षित आहे; पण हा कार्यक्रम पहाता याउलट होत आहे’, असे लक्षात येते.
४. ‘रॅपिंग’ नावाचा पाश्चात्त्य संगीत प्रकार कविता वाचनापेक्षाही खालच्या दर्जाचे असणे
नुकतेच एका चित्रपटात वेगळ्या प्रकारचे संगीत ज्याला ‘रॅपिंग’ असे म्हटले जाते, हे प्रथमच ऐकले. या गाण्याच्या प्रकारात गाण्याचे बोल, हे एखादे वाचन केल्यासारखे म्हटले जाते. ‘सूर, ताल आणि लय यांचा मिलाप होऊन आजपर्यंत आम्ही जे सुमधूर संगीत ऐकले, त्याच्या तुलनेत हा ‘रॅपिंग’ नावाचा गाण्याचा प्रकार पाहून ‘आपले कविता वाचनही अनेक पटींनी उत्तम आहे. किंबहुना कविता वाचनाशीही याची तुलना करणे योग्य वाटत नाही’, असे वाटले.
५. एका इंग्रजी वाहिनीवर अमेरिकेतील संपूर्ण काल्पनिक कथेवर आधारित असणारी मालिका भारतात प्रसिद्ध होणे
हे सर्व पाहून ज्यांच्याकडे आम्ही गेलो होतो, त्या व्यक्तींशी आपोआपच सध्याच्या कला क्षेत्राशी संबंधित बोलणे चालू झाले. तेव्हा आम्हाला समजले, ‘सध्या एका इंग्रजी वाहिनीवर अमेरिकेतील एक इंग्रजी मालिका भारतात पुष्कळ प्रसिद्ध झाली आहे. ही मालिका काल्पनिक कथेवर आधारित आहे.
६. वास्तवापासून दूर नेणार्या आणि समाजाला काडीमात्र मार्गदर्शक न ठरणार्या अशा मालिकांमुळे लोकांची वृत्ती बिघडली (खालच्या स्तराला गेली) असणे
अशा अनेक निरर्थक मालिकांच्या माध्यमातून अश्लीलता, स्वैराचार, अनैतिकता यांचा पगडा वाढत चालला आहे. यामुळे माणूस पशूसमान होऊन त्याची वृत्ती बिघडली (खालच्या स्तराला गेली) आहे. अशा या मालिकांचा प्रभाव भारतियांवर एवढा आहे की, आयुष्यात कधीही पूजा-अर्चन करण्यासाठी एकदाही पहाटे न उठणारी मंडळी या मालिकेचे भारतीय वेळेनुसार प्रक्षेपण पहाण्यासाठी सकाळी ६ वाजताचा गजर लावून आवर्जून उठलेले ऐकण्यात आले.
७. आताचे कलाकार हे संस्कृती रक्षकाऐवजी संस्कृतीभक्षक बनले असणे
हे सर्व पहाता ‘आपल्याला आपल्याच गोष्टींचे महत्त्व नाही’, हे स्पष्ट होते. आपणच आपल्या संस्कृतीचे भक्षक झालो आहोत. गेल्या १० ते १५ वर्षांमध्ये कला क्षेत्राचा दर्जा सध्या स्वतःला कलाकार म्हणणार्या भक्षकांनी अत्यंत वेगाने खालच्या पातळीला नेला आहे. ज्याचा द्वेष वाटायला हवा, त्याचा आपण अंगीकार केला आहे. त्यांनी आपल्या जवळील सोन्यापेक्षा अमूल्य गोष्टींना मातीमोल केले आहे.
८. ‘नैतिकतेचे अधःपतन करणार्या अशा गोष्टींपासून स्वतःला आणि स्वतःच्या पाल्याला दूर ठेवण्यासाठी अन् येणार्या पिढीला राष्ट्र अन् धर्म यांच्याप्रती आदर वाटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’, अपरिहार्य असणे
वास्तवापासून दूर नेणारे, अनैतिकतेला वाव देणारे, स्वैराचारी, आयुष्यात माणसाला आंधळे करणारे कोणतेही मनोरंजनाचे माध्यम असले, तरी त्यापासून आपण आपल्या मुलांना दूर ठेवायला हवे. यासाठी समष्टी शिक्षणाची पद्धत पालटायला हवी. आपल्या संस्कृतीचे संगोपन करणारी, राष्ट्र आणि धर्म यांचा मान राखून त्याचे रक्षण करणारी, नैतिकतेच्या मार्गावर चालणारी आणि या सर्वांच्या मागे ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित असणारी पिढी घडवण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची एकमात्र आवश्यकता आहे. त्यासाठी ‘प्रत्येकाला आवर्जून धर्मशिक्षण देऊन कृतीप्रवण करणे’, हीच सध्या काळाची निकड आहे.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, जयपूर, राजस्थान.