‘छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृतीनुसार झाली !’ – आमदार रोहित पवार, शरद पवार गट

आमदार रोहित पवार

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘छावा’ चित्रपट पाहिला. त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना त्यांनी ‘एक्स’वर लिहिले की, ‘छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येला मनुस्मृती उत्तरदायी (जबाबदार) आहे. औरंगजेबाला मनुस्मृती कुणी सांगितली ?, याचाही शोध घेणे महत्त्वाचे आहे.’ (हिंदूंवर जिझिया कर लादणारा औरंगजेब हिंदूंची मनृस्मृती कधी ऐकून घेईल का ? शालेय विद्यार्थ्यालाही जे कळेल, ते न कळणारे म्हणे आमदार ! – संपादक)

आमदार रोहित पवार पुढे म्हणाले की, ‘अनन्वित अत्याचार सहन करूनही शंभूराजे त्यांच्या भूमिकेपासून तसूभरही हटले नाहीत, किंबहुना मरण पत्कारले; पण शरण गेले नाहीत. त्यांचा केलेला अनन्वित छळ आणि दिलेल्या मरणयातना, म्हणजे मनुस्मृतीतील शिकवणुकीचा प्रयोग होता. मनुस्मृतीत सांगितल्याप्रमाणे एखाद्याचा अमानवी पद्धतीने छळ कसा करायचा, याविषयीची माहिती औरंगजेबापर्यंत कुणी पोचवली ?, हेही पाहण्याची आवश्यकता आहे.’ (अन्य पंथियांच्या धार्मिक पुस्तकातील लिखाण कधी रोहित पवार यांनी वाचले आहे का ? काफिरांना कशा प्रकारे मारा ? ही त्यांची शिकवण रोहित पवार यांना माहीत आहे का ? – संपादक) ‘लाचारी सोडून कुठल्याही संकटाला भिडण्याची, लढण्याची आणि झुंजण्याची प्रेरणा या चित्रपटातून मिळते. शत्रू हा कायम उघडपणे विरोधातच असतो. काही जवळच्या माणसांपासूनही सावध रहाण्याची आवश्यकता असते, याचाही धडा मिळतो. आजच्या राजकीय परिस्थितीत तर सर्वांनाच हा धडा तंतोतंत लागू होतो’, असेही रोहित पवार म्हणतात.

हे त्यांचे वक्तव्य पहा !

संपादकीय भूमिका

  • औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरतेने हत्या केली, हा इतिहास असतांना त्यातही जात्यंधता प्रकट करणारे धर्मांधांचे लांगूलचालन करणारे आणि शिवद्रोही नव्हेत का ?
  • रोहित पवार यांच्या आजोबांनी, म्हणजे शरद पवार यांनी वर्ष १९९३ च्या मुंबई बाँबस्फोट प्रकरणात मुसलमानांना वाचवण्यासाठी ‘मुसलमानबहुल भागातही एक बाँबस्फोट झाला’, असे खोटे विधान करून ‘बाँबस्फोट केवळ हिंदूंच्याच विरोधात झाले नाहीत’, असे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आज त्यांचे नातूही क्रूरकर्मा औरंगजेबाला वाचवण्यासाठी मनुस्मृतीवर टीका करत आहेत. ‘यावरून अशांची मानसिकता जनतेच्या समोर येत आहे’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ?