युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी लंडनमध्ये घेतली ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांची भेट

लंडन (ब्रिटन) – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या वादानंतर दुसर्याच दिवशी झेलेंस्की ब्रिटनमध्ये पोचले. तिथे त्यांचे पंतप्रधान केयर स्टॉर्मर यांनी स्वागत केले. स्टॉर्मर यांनी झेलेंस्की यांना मिठी मारली आणि ‘ब्रिटन युक्रेनच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे’ असे आश्वासन दिले. ते म्हणाले की तुम्हाला (झेलेंस्की यांना) संपूर्ण ब्रिटनचा सदैव पाठिंबा आहे.’ दोन्ही नेत्यांच्या बैठकीत ब्रिटनने युक्रेनला २२६ कोटी पौंड (२४ सहस्र ८६३ कोटी रुपयांचे) कर्ज देण्याची घोषणा केली. युरोपीय देशांमध्ये युक्रेनला साहाय्य करण्यासाठी कुठली रणनीती अवलंबावी ?, यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात असतांना ब्रिटनने साहाय्य केल्याने युक्रेनमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
२ मार्च या दिवशी लंडनमध्ये युरोपीय देशांची एक शिखर परिषद झाली. या शिखर परिषदेत फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क, इटलीसह १३ देश सहभागी झाले होते. तसेच ‘नाटो’चे (‘नाटो’ म्हणजे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना) सरचिटणीस, युरोपीयन युनियन आणि युरोपीयन कौन्सिल यांचे अध्यक्ष उपस्थित होते.
नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांनी झेलेंस्की यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्याशी संबंध सुधारावेत. ट्रम्प यांनी आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्याचा झेलेंस्की यांनी आदर राखावा. भविष्यात शांतता चचर्चेसाठी युक्रेनला पुरेसे सुरक्षा साहाय्य मिळेल, याची निश्चिती करण्यासाठी अमेरिका आणि युरोप यांनी एकत्र काम केले पाहिजे.
युक्रेनला पाठिंबा देण्याच्या सूत्रावर युरोपीयन युनियनमध्ये मतभिन्नता
युक्रेनला पाठिंबा देण्याच्या सूत्रावर युरोपीयन युनियनमध्येही मतभिन्नता आहे. हंगेरीचे पंतप्रधान ऑर्बन व्हिक्टर यांनी झेलेंस्की यांच्या विरोधात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, बलवान लोक शांतता निर्माण करतात, कमकुवत लोकांना युद्ध हवे असते. राष्ट्र्राध्यक्ष ट्रम्प यांनी धैर्याने शांततेसाठी भूमिका घेतली आहे.
स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी म्हटले की, आम्ही युक्रेनला आर्थिक आणि सैनिकी साहाय्य करणार नाही; कारण युक्रेन कधीही सैनिकी बळाचा वापर करून रशियाला वाटाघाटीच्या पटलावर आणू शकणार नाही.