सातारा – महाबळेश्वर तालुक्यातील भिलार येथे खरेदीखत करणार्या व्यक्तीचे नाव नोंद करण्याऐवजी दुसर्याच बनावट नावाची नोंद सातबारा उतार्याला केली आहे. यामध्ये पाचगणी येथील मंडल कार्यालयाचा प्रचंड गोंधळ निदर्शनास आला आहे. हा प्रकार येथीलच माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कांबळे यांनी उघड केला आहे.
सातबारा उतार्यामध्ये ऑनलाइन नोंदीमध्ये जाणीवपूर्वक चूक केली जात आहे. ही चूक लक्षात आल्यानंतर व्यक्ती चुक दुरुस्त करण्यासाठी पुन्हा मंडल कार्यालयात येतो; मात्र त्या वेळी चूक दुरुस्तीसाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागते. कार्यालयाकडून झालेल्या नोंदीच्या चुकांचा भुर्दंड सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. मंडल अधिकारी आणि तलाठीही स्वतःच केलेली चूक खातेदाराच्या अंगावर झटकून मोकळे होत आहेत. त्यामुळे चुकीची दुरुस्ती करण्यासाठी पैसे उकळण्याचे एक चांगले कुरण शासकीय अधिकार्यांना मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत, तसेच महसूल विभागाच्या प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी वेळीच योग्य ती पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशा अनागोंदी कारभार करणार्या तलाठी आणि मंडल अधिकारी यांची दप्तरे तपासण्यात यावीत, म्हणजे आतापर्यंत झालेल्या बनावट नोंदी पुढे येतील, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.