Telugu Compulsory In Schools : तेलंगाणामध्ये सर्व शाळांना तेलुगू भाषा शिकवणे अनिवार्य ! – काँग्रेस सरकारचा आदेश

भाग्यनगर (तेलंगाणा) : तेलंगाणामधील काँग्रेस सरकारने सर्व शाळांमध्ये तेलुगु  भाषा अनिवार्य केली असून यासंदर्भात राज्य शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय प्रसारित केला आहे. हा आदेश सी.बी.एस्.ई. (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ), आय.सी.एस्.ई. (इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकेंडरी एज्युकेशन – भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र) आणि इंटरनॅशनल बॅकलॅरिएट (आयबी) यासह सर्व मंडळांशी संलग्न शाळांना लागू आहे. नवीन आदेश शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू होईल, तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आदेश शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू होईल. तेलंगाणामधील बहुतेक शाळा सरकारी आहेत, जिथे तेलुगु शिक्षण सामान्य आहे; परंतु राज्याबाहेरील मंडळांच्या अंतर्गत येणार्‍या शाळा मोठ्या प्रमाणात तेलुगु शिकवत नाहीत.

१. तेलंगाणा सरकारने तेलुगु भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय अशा वेळी घेतला आहे, जेव्हा शेजारील राज्य तमिळनाडू राष्ट्रीय शिक्षण धोरणाला विरोध करत आहे; कारण या धोरणामुळे विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा लादण्याचा दावा होत आहे.

२. एका शिक्षणतज्ञाने म्हटले की, तेलंगाणामध्ये एक तृतीयांशपेक्षा अधिक शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. हा निर्णय लागू करून इंग्रजीपासून दूर जाण्याचा प्रयत्न नसून विद्यार्थ्यांना मातृभाषेची ओळख होण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा वाचता आणि लिहिता आली पाहिजे.

संपादकीय भूमिका

महाराष्ट्रात सर्व शाळा आणि सर्व बोर्ड यांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असली, तरीही अनेक बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय पर्याय म्हणून शिकवला जातो. आता महाराष्ट्र सरकारनेही तेलंगाणाप्रमाणे राज्यभाषा शिकणे सर्वांसाठीच अनिवार्य केले पाहिजे !