|

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील शेख हसीना सरकारच्या सत्तापालटानंतर परिस्थिती झपाट्याने पालटली आहे. आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण पालटतांना दिसत आहे. निवडणुकांना होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशाच्या सैन्यदलप्रमुखांनी राजकीय पक्षांना चेतावणी दिली आहे. सैन्यदलप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी म्हटले आहे की, राजकीय पक्षांनी या वर्षीच निवडणुका घ्याव्यात. जर ते एकमेकांशी लढत राहिल्यास देशाचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते. मला इतर कोणत्याही इच्छा नाहीत. मला केवळ देश सुरक्षित हातात पहायचा आहे. गेल्या ७-८ महिन्यांत मी खूप काही अनुभवले आहे. मी तुम्हाला आधीच चेतावणी देत आहे जेणेकरून तुम्ही उद्या असे म्हणू नका की, मी तुम्हाला सांगितले नव्हते. मला वाटले माझे काम झाले आहे; पण ते सोडवायला मला अधिक वेळ लागेल. त्यानंतर मी रजा घेईन.
सैन्यदलप्रमुखांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा देशातील विविध विद्यार्थी गटांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. याच गटांमुळे शेख हसीना यांचे सरकार पाडण्यात आले. दुसरीकडे महंमद युनूस सरकारमधील माहिती सल्लागार आणि विद्यार्थी चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या नाहिद इस्लाम याने मंत्रीमंडळातून त्यागपत्र दिले आहे. त्याने म्हटले की, देशातील सध्याची परिस्थिती पहाता एका नवीन राजकीय शक्तीचा उदय होणे आवश्यक आहे. जनआंदोलनाला बळकटी देण्यासाठी रस्त्यावर उतरण्यासाठी मी सल्लागार परिषदेचे त्यागपत्र दिले आहे.