NASA and SpaceX’s Mission Succeeds : अंतत: अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतले !

  • ‘नासा’ आणि ‘स्पेसएक्स’ यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेला यश !

  • ९ महिन्यांत पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतरापेक्षाही अधिक अंतर कापले !

अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स

वॉशिंग्टन (अमेरिका) : अंतराळयानातील तांत्रिक अडचणींमुळ तब्बल ९ महिने (२८६ दिवस) अंतराळात घालवल्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अंतत: पृथ्वीवर परतले. भारतीय वेळेनुसार १९ मार्चच्या पहाटे ३.३० वाजता फ्लॉरिडाच्या किनार्‍याजवळ नासाचे हे दोन्ही अंतराळवीर सुरक्षितपणे खाली उतरले. मूळ मोहीम ८ दिवसांची होती; परंतु काही तांत्रिक बिघाडामुळे अंतराळविरांना २८६ दिवस अंतराळात रहावे लागले. नासाने अंतराळवीर पृथ्वीवर उतरल्याच्या क्षणाचा व्हिडीओ प्रसारित केला आहे. लांबलेल्या मोहिमेच्या काळात दोघा अंतराळविरांनी ४ सहस्र ५७६ वेळा पृथ्वीला फेरी मारली आणि पृथ्वीवर सुरक्षितपणे परतण्याआधी जवळपास १९५ दशलक्ष किलोमीटर प्रवास केला. हे अंतर पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतरापेक्षाही अधिक आहे. सूर्य हा पृथ्वीपासून साधारण १५० दशलक्ष किलोमीटर दूर आहे.

१. या दोघांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते. एक काळ असा होता की, दोघे जिवंत परततील कि नाही ?, अशी शंका होती; परंतु ‘स्पेसएक्स’चे प्रमुख इलॉन मस्क यांच्या पुढाकाराने आणि ‘नासा’च्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी झाली.

२. ‘नासा’ आणि ‘स्पेसएक्स’ यांच्या तंत्रज्ञांची बैठक होऊन फ्लॉरिडामधील वातावरणाचा अंदाज घेण्यात आल्यानंतर परतीचा प्रवास एक दिवस आधीच चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोघे अंतराळवीर ‘स्पेसएक्स कॅप्सूल’मधून ‘आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन’हून निघाल्यानंतर काही तासांतच ‘गल्फ ऑफ मेक्सिको’ येथे उतरले.

इलॉन मस्क यांनी जो बायडेन यांच्यावर केला आरोप !

‘स्पेसएक्स’चे मुख्य अभियंता आणि प्रमुख इलॉन मस्क यांनी या मोहिमेच्या यशाविषयी ‘फॉक्स न्यूज’शी बोलतांना म्हटले की, मी बायडेन प्रशासनाकडे या मोहिमेची आखणी करण्यासाठी अनुमती मागत होतो; परंतु त्यांनी यास प्राधान्य दिले नाही, अन्यथा अनेक महिन्यांपूर्वीच दोघा अंतराळविरांना पृथ्वीवर आणता आले असते. ट्रम्प यांनी या मोहिमेला प्राधान्य दिल्याने हा क्षण आता आम्हाला पहायला मिळत आहे.

४५ दिवसांच्या ‘ॲक्लमेटायझेशन प्रोग्राम’मधून जावे लागणार !

(ॲक्लमेटायझेशन म्हणजे अशी प्रक्रिया ज्याद्वारे एखाद्या जिवाला तेथील वातावरणाशी समरस होण्यासाठी केले जाणारे प्रयत्न ! यात आर्द्रता, गुरुत्वाकर्षण, तापमान आदी गोष्टींचा विचार केला जातो.)

तब्बल ९ महिने संपूर्णपणे वेगळ्या वातावरणात राहिल्यामुळे दोघा अंतराळविरांच्या शरिराची झालेली झीज भरून काढण्यासाठी त्यांना ४५ दिवसांच्या ‘ॲक्लमेटायझेशन प्रोग्राम’मध्ये रहावे लागणार आहे. त्यानंतरच दोघांना पूर्वीसारखे सामान्य आयुष्य जगता येईल. पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वास्तव्य केल्यामुळे या दोघांच्या शरिरात झालेले पालट, शरिराची झालेली झीज किंवा त्यांच्या शरिराने अंतराळ स्थानकातील वातावरणाशी जुळवून घेतल्याने पालटलेल्या गोष्टी हे सर्व पूर्वपदावर येण्यासाठी हा काळ त्यांनी नियोजित उपचार घेण्यासाठी आवश्यक असेल.

४५ दिवसांच्या काळामध्ये या दोघांना पृथ्वीवरील वातावरण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल अन् त्यामुळे प्रभावित होणार्‍या त्यांच्या शरिरातील क्रिया या सामान्य स्थितीत येण्यासाठी साहाय्य केले जाईल.

सुनीता विल्यम्स यांच्या मूळ गावी यज्ञासह देवीला अर्पण केले होते सहस्रो किलो तूप !

सुनीता विल्यम्स यांचे गुजरातचे झुलासन हे मूळ गाव ! येथे त्यांचे कुटुंबीय रहातात. त्या अंतराळात अडकल्यानंतर या गावात त्यांच्या नातेवाइकांसमवेतच अवघ्या गावात चिंता पसरली होती. अंतराळातून सुनीता विल्यम्स सुरक्षितपणे परताव्यात, यासाठी गुजरातमधील त्यांचे चुलत भाऊ दिनेश रावल यांनी यज्ञ केला होता. ‘आम्ही आमच्या गावी देवीची प्रार्थना चालू केली होती. वरदाई देवीला सहस्रो किलो तूप अर्पण केले होते. गावातील रघुनाथ शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत यज्ञ ठेवण्यात आला होता. आज मला वाटते की, आमच्यासाठी सोनेरी दिवस आहे’, अशी प्रतिक्रिया दिनेश रावल यांनी दिली.