महाकुंभमेळ्यात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आज लेख लिहिपर्यंत ५५ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमासह गंगा नदीत पवित्र स्नान केले आहे. कुंभमेळ्यात लोकांची गर्दी अखंड चालूच आहे. प्रशासनाने व्यवस्था चांगली करण्याचा प्रयत्न केला आहे, हे लक्षात येते; मात्र एक पत्रकार म्हणून कुंभक्षेत्री फिरतांना ज्या अडचणी, समस्या जाणवल्या त्या येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

१. कुंभक्षेत्रात वाढत जाणारी भाविकांची गर्दी

सर्वसाधारणपणे अमृतस्नानानंतर, म्हणजे ३ फेब्रुवारीनंतर महाकुंभातील गर्दी न्यून होईल, असा अंदाज होता; मात्र गर्दी न्यून न होता ती वाढतच जात आहे. कुंभक्षेत्रातून आखाड्यांनी प्रस्थान केले आहे; मात्र भाविकांचा ओढा वाढत आहे. बहुतांश हिंदूंची काहीही करून स्नान व्हावे, अशीच इच्छा दिसते. आता महाशिवरात्रीचे, म्हणजे २६ फेब्रुवारी या दिवशीचे पर्वस्नान शेष आहे. महाकुंभक्षेत्री येणार्या भाविकांशी संवाद साधल्यावर कळले की, या वेळी बहुतांश भाविक कुंभमेळ्याला पहिल्यांदाच आले आहेत. ‘यंदाचा महाकुंभ १४४ वर्षांनंतर आला आहे, तिचा लाभ घेतला पाहिजे’, यादृष्टीने भाविक येत आहेत. महाकुंभमेळ्याचा प्रसारही पुष्कळ झाला असल्यामुळे कसेही करून महाकुंभात येऊन स्नान करण्यासाठीची उत्सुकता दिसते.
उदाहरण द्यायचे झाल्यास राणे नावाच्या मुंबईतील व्यक्तीने रेल्वेचे तिकीट मिळत नाही, विमानाचे तिकीट परवडत नाही; म्हणून थेट दुचाकीनेच प्रयागराजकडे प्रयाण केले. त्यांच्याप्रमाणे काही जण दुचाकी घेऊन, तर काहींनी चारचाकी घेऊन कुंभक्षेत्री निघाले. बिहार येथून रेल्वेगाड्यांना अतीप्रचंड गर्दी असल्याने तेथील तरुणांचा गट ८० घंट्यांचा जलमार्गाने प्रवास करून प्रयागराज येथे पोचला.
२. कुंभक्षेत्राचे स्वरूप समजण्यासाठी मोठ्या नकाशांची आवश्यकता !
कुंभक्षेत्री एखादा भाविक आल्यानंतर त्याला अमुक एका सेक्टरमध्ये, तसेच त्रिवेणी संगम अथवा गंगेचे घाट येथे कसे जावे ? याचे नकाशे प्रत्येक प्रवेशद्वार, गर्दीची ठिकाणे येथे आढळले नाहीत. प्रशासनाकडून भाविकांसाठी काही ठिकाणी रहाण्यासाठी तंबू उभारले होते. हे तंबू विविध सेक्टरमध्ये विखुरले होते; मात्र ते नेमके कुठे आहेत ? तेथे कसे जायचे ? याची माहिती कुठे दिल्याचे आढळले नाही. ज्या भाविकांना अथवा भाविकांच्या समुहाला त्यांची माहिती आहे, तेवढेच तेथे पोचू शकतात.
कुंभक्षेत्री अनेक चौकांमध्ये मोठ्या ‘स्क्रीन्स’ लावल्या होत्या, खरे तर त्यांचा उपयोग आधीपासून करून त्यावर कुंभमेळ्याच्या रचनेची माहिती, दिशादर्शक आकृत्या यांद्वारे लोकांच्या डोळ्यांसमोर कुंभमेळा नेमका कशा प्रकारे वसला आहे ?, हे स्वरूप ठेवणे आवश्यक होते. स्क्रीन्सचा उपयोग गर्दीची ठिकाणे दाखवण्यासाठी होऊ शकतो, जेणेकरून त्या ठिकाणी भाविक जाणे टाळू शकतात.
३. पोलिसांना वाहतूक नियंत्रणाचे प्रशिक्षण नाही
चौकाचौकांत पोलीस बॅरिकेड्स लावून उभे असायचे. त्या वेळी काही मार्ग बंद, तर काही अर्धवट चालू होते. काही मार्गांवर वाहनांना जाण्यास प्रतिबंध होता; मात्र या ठिकाणी उभे असलेले पोलीस नेहमी गोंधळलेल्या स्थितीत दिसले. लेटे (बडे) हनुमान मंदिराकडे जाणारा मार्ग बंद होता; मात्र दुचाकीस्वार तेथे आले की, काही पोलीस बॅरिकेड्स उघडायचे, तर काही बंद ठेवायचे. संगम मार्गावर लोक चहुबाजूंनी प्रवेश करत होते. त्यामुळे लोक चारही बाजूंनी समोरासमोर येत होते. त्यात दुचाकी, चारचाकी वाहने अगदी एकमेकांना चिकटून जात होती. लोक आणि त्यात वाहने अशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गांनी समोरासमोर आल्यावर वाहतूक पुढे सरकणार कशी ? त्याचा मन:स्ताप न केवळ भाविक आणि वाहनचालक यांना होता, तर पोलिसांनाही होत होता. अनियंत्रित पद्धतीने वाहतूक चालू होती. अशीच परिस्थिती काही रस्त्यांवर दिसली. पोलिसांना वाहतूक नियंत्रण करता येत नाही, तर स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांकडे त्याचे उत्तरदायित्व तरी सोपवले पाहिजे होते. अन्यथा पोलिसांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षित करणे आवश्यक होते. पोलिसांवर पुष्कळ ताण होता तरीही एरव्ही त्यांच्यात दिसणारी असहकार्याची भूमिका, उर्मटपणा येथे दिसला नाही. भाविकांना सेक्टरचा पत्ता सांगण्यास, गंतव्य स्थानी जाण्याविषयी मार्गदर्शन करण्यास पोलीस सहकार्य करत होते.
पोलीस-पत्रकार, पोलीस-नागरिक यांच्यात काही ठिकाणी संघर्षाचा भाग झाला. काही सेक्टर गंगानदीच्या एका बाजूला, तर काही दुसर्या बाजूला होते. एका बाजूने नदी ओलांडून दुसर्या बाजूला जाण्यासाठी ‘पांटून’ (तात्पुरत्या स्वरूपात उभारलेले लोखंडी पूल) पुलाची व्यवस्था केली होती. हे पांटून पूल काही वेळा बंद असायचे, त्यामुळे नागरिक पांटून पूल ओलांडण्याच्या रस्त्यापर्यंत आले की, त्यांना काही अंतरावरील दुसर्या पांटून पुलातून जावे लागे. यामुळेही दुचाकी आणि भाविक यांची गर्दी पांटून पुलावर वाढत असे. पांटून पूल तसे पाहिले, तर अरूंद असतात. एकदा त्यावर चारचाकी वाहन चढले, तर ते पूर्ण जागा व्यापते, वाहनाशेजारून अधिकतर २-३ भाविक चालू शकतील एवढीच जागा होती. गर्दीच्या वेळी ही चारचाकी वाहने या पुलावर शिरतात, अनेक दुचाकी चढतात, त्यावरून आधीच भाविकांचे जथ्थे जात असतात, अशा वेळी चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पांटून पूल, म्हणजे नदीच्या अगदी टोकाकडील भागातील ठेवल्यास मधल्या पुलांवरून भाविक आरामात चालत आणि दुचाकींद्वारे जाऊ शकतात.
४. काही पत्रकारांकडून पोलिसांच्या अडवणुकीविषयी अप्रसन्नता
दूरदर्शनच्या एका पत्रकाराने त्याचा अनुभव सांगतांना म्हटले की, महाकुंभामध्ये विविध सेक्टरमध्ये कार्यक्रमांचे वार्तांकन करण्यासाठी जातांना आमच्याकडे कुंभमेळ्याचा अधिकृत पास (परवाना) असतांनाही पोलीस अडवणूक करतात. त्यामुळे कित्येक किलोमीटर फिरावे लागले. कुंभावर पोलिसांचे नियंत्रण अधिक आहे, असे वाटते. अन्यही अनेक पत्रकारांनी ‘मुख्य रस्त्यांवरील वाहतूक पोलिसांनी अडवून आम्हाला कार्यक्रमस्थळी जाण्यास पुष्कळ अडचण निर्माण केली’, असे सांगितले.
५. स्नानासाठी त्रिवेणी संगमासह अन्य घाटांवर जाण्यासाठी भाविकांना प्रवृत्त करणे
बहुतांश भाविकांचा कल त्रिवेणी संगमाच्या ठिकाणीच स्नान करण्याकडे होता. त्रिवेणी संगमाचा परिसर काही लाख लोक एकाच वेळी उभे राहून स्नान करू शकतील एवढा मोठा नाही. शासनाच्या वतीने स्नानासाठी गंगानदीच्या दोन्ही तिरांवर २० हून अधिक घाट बांधले आहेत. तेथेच भाविकांना स्नान करण्याविषयी कुंभमेळा चालू झाल्यापासून वारंवार सूचनांद्वारे सांगणे आवश्यक होते. कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्यानंतर याविषयी जागृती चालू झाली, तसेच त्रिवेणी संगमावर एकाच वेळी काही सहस्र लोक स्नान करू शकतात; मात्र जे स्नानाला गेले, त्यापैकी काही जण ५ मिनिटांत स्नान करून बाहेर येतात, तर काही जण पाण्यात खेळत बसतात.त्यामुळे भाविकांच्या पुढील तुकडीला थांबून रहावे लागते आणि मागील गर्दी वाढत रहाते. गर्दीवर एकमेकांचा दबाव वाढतो. अतिशय खेटून म्हणजे एकमेकांच्या अंगावर पडूनच चालत जावे लागते. काही भाविक अंघोळ झाल्यावर अगदी किनार्यालाच कपडे पालटतात, त्यामुळे मागील गर्दीला पुढे येणे अशक्य होते किंवा एकमेकांच्या अंगावर भाविक पडतातही. यामध्ये वृद्ध स्त्रिया, महिला, मुले यांचे हाल होतात. त्यामुळे स्नानाला सोडण्यासाठीही आणि स्नानाला नदीत उतरलेल्यांना समयमर्यादेत बाहेर काढण्यासाठी यंत्रणा हवी, जेणेकरून पुढील भाविकांचे स्नान व्यवस्थित होऊ शकेल.
६. प्रयागराज येथे वाहतुकीचे नियम पाळण्याविषयी गांभीर्याचा अभाव
आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रयागराज येथे वाहतुकीचे कोणतेही नियम कुणी पाळतांना दिसले नाही. दुहेरी वाहतुकीसाठी मोठे रस्ते असले, तरी एकाच बाजूने विरुद्ध दिशेने केवळ दुचाकीच नाही, तर चारचाकी गाड्याही वेगाने येतात. अशा वेळी अपघात होण्याची शक्यता होती. मला पहिल्यांदा वाटले की, महाकुंभामुळे लोक असे विरुद्ध दिशेने वाहने चालवतात. नंतर समजले येथील लोक नेहमीही अशीच चुकीच्या पद्धतीने वाहने चालवतात. वाहतूक सिग्नलच्या वेळी लाल दिवा लागल्यावर मी दुचाकी थांबवली; मात्र माझ्या मागून सर्वच वाहने पुढे गेली. सिग्नलला कुणीच वाहने थांबवली नाहीत. प्रत्येक दिवशी हीच स्थिती ! वाहतूक पोलीसही केवळ बघ्याची भूमिका घेतल्याप्रमाणे अथवा हतबलतेने पहातांना दिसले. जिथे पुष्कळ अडचण निर्माण झाली, तेथेच ते उभे राहून वाहतूक नियंत्रण करतांना दिसले.
प्रमुख अमृतस्नानाच्या तिथींना, पर्वस्नानाच्या तिथींना, या तिथींच्या २ दिवस आधी आणि नंतर येथील मार्गांवर समोरासमोर अन् विरुद्ध दिशेने वाहने चालवल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडी झाल्यावर वाहतूक पोलीस आणि अन्य पोलीस कामाला लागतात; मात्र त्यापूर्वी वाहतूक गतीमान रहाण्यासाठी प्रयत्न करत नाहीत.
७. कुंभनगरीतून रेल्वेस्थानकावर जातांना होणारी वाहतूक कोंडी
कुंभनगरीतून रेल्वेस्थानकावर जातांना वाटेत चौकाच्या ठिकाणी अनेक रिक्शा रस्त्याच्या शेजारी उभ्या केलेल्या दिसल्या. प्रत्येक चौकाच्या ठिकाणी रिक्शा उभ्या असल्याने साहजिकच रस्ता अरुंद होतो आणि या अरुंद रस्त्यावरून वाहने पुढे जातांना अडकतात अन् तेथे वाहतूककोंडी होते. रिक्शांसह रस्त्याच्या कडेला लावलेली वाहने हे येथील रस्त्यांवर वाहतूककोंडी होण्यामागील एक कारण आहे. ही वाहने बर्याच अंतरापर्यंत असतात. पोलीस या वाहनांना हटकत नाहीत, ना त्यांना मुख्य रस्त्यावरून वाहने काढण्यास सांगतात. ते केवळ चौकांत उभे राहून वाहतूक नियंत्रण करत असतात. ज्यामुळे वाहतूक कोंडी कधीच सुटत नाही. वाहतूककोंडीची भीषणता ४ फेब्रुवारीनंतर वाढली. काही दिवस २० ते २५ कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागत होत्या. काही दिवस तर मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांपर्यंत वाहतूककोंडीची समस्या येत होती. परिणामी मध्यप्रदेश सरकारलाही त्यांच्या भागात वाहतूककोंडीत अडकलेल्या भाविकांच्या आश्रयाची व्यवस्था करावी लागली.
प्रयागराज कुंभमेळा क्षेत्रातून प्रयागराज जंक्शन रेल्वेस्थानकाकडे जाण्यास एरव्ही २० मिनिटे लागतात, तर वाहतूककोंडीमुळे ४ ते ५ घंटे वेळ लागत होता. प्रयागराज संगम स्थानक तर काही दिवस बंद ठेवण्याची वेळ आली. या वाहतूककोंडीची कल्पना नसल्याने अनेक प्रवाशांच्या रेल्वे गाड्या चुकल्या. त्यामुळे त्यांना अन्य रेल्वे गाड्यांतून सामान्य वर्गातून वेगळे तिकीट काढून प्रचंड गर्दीतून जावे लागले. रेल्वेस्थानकांच्या परिसरात एवढी गर्दी दिसली की, जणू तेथे एखादी मोठी सभा चालू आहे.
८. कुंभक्षेत्री प्रवासासाठी जलमार्गाचे पर्याय वापरणे आवश्यक !
कुंभक्षेत्री रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक यांद्वारे जाण्यासाठी गर्दीचा दबाव पहाता अन् नंतर होणारी वाहतूककोंडीची भीषण समस्या पहाता जलमार्गाद्वारे मोठ्या बोटींद्वारे भाविकांना संगमापर्यंत अथवा घाटांपर्यंत नेऊन तिथे स्नान करून परत आणता येऊ शकते का ? याचाही सरकारने विचार करावा.
९. काही तरुणांची कौतुकास्पद कृती !
कुंभमेळ्यासाठीचा वाहनतळ मेळाक्षेत्रापासून अनुमाने ८ ते १० कि.मी. दूर अंतरावर होता. तेथे उतरून दुचाकीने, तर काही भाविकांना चालतही प्रत्यक्ष घाटाच्या ठिकाणी जावे लागे. या वेळी कुंभमेळा परिसरात दूरच्या अंतरावरील ठिकाणांकडे जाण्यासाठी काही तरुणांनी विनामूल्य दुचाकींची सुविधा उपलब्ध केली, तर काहींनी मात्र भाविकांच्या समस्येचा अपलाभ घेत भरपूर पैसे उकळले. त्यांच्यावर नंतर पोलिसांनी कारवाई करून लाखो रुपयांचा दंड वसूल केला.
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल, रायगड. (१९.२.२०२५)