वाटद येथे एम्.आय.डी.सी.साठी भूसंपादन करण्यास ग्रामस्थांचा कडाडून विरोध

भूमीची मोजणी करण्यास आलेल्या महसूल विभागाच्या पथकावर माघारी जाण्याची वेळ

ग्रामस्थांचा तीव्र विरोध

रत्नागिरी – तालुक्यातील वाटद एम्.आय.डी.सी.साठी भूसंपादन करण्यास येथील स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने संयुक्त मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकार्‍यांना ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे माघारी परतावे लागले.

भूमी अभिलेख विभागाकडून १२ फेब्रुवारीला संयुक्त मोजणीसाठीची नोटीस कळझोंडीतील संबंधित भूमीमालक, शेतकरी आणि ग्रामस्थ यांना वेळेत देणे आवश्यक होते. मोजणीला ८ दिवस असतांना नोटीस वितरण चालू करण्यात आले. त्यामुळे अनेक ग्रामस्थ मोजणी प्रक्रियेपासून अनभिज्ञच राहिले. असे असतांना याविषयी कोणतीही पूर्वसूचना न देता भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी २१ फेब्रुवारीला सकाळी कळझोंडी येथे आले. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थही तेथे एकत्र जमले. ग्रामस्थांनी प्रांत विभागाकडून देण्यात आलेल्या नोटीसीविषयी अधिकार्‍यांना खडसावले आणि भूमी मोजणीला विरोध असल्याचे निवेदन दिले. ग्रामस्थ एकवटल्यामुळे पोलिसांना बोलवण्यात आले; मात्र ग्रामस्थांचा तीव्र विरोध पाहता अधिकार्‍यांनी येथील एका खासगी आस्थापनाच्या १५ एकर भूमीचीच मोजणी केली अन् ते माघारी फिरले.