पुणे येथे मारहाणीचा गुन्हा न नोंदवण्यास पोलीस ठाण्यातच पोलीस हवालदारावर दबाव

पोलीस आयुक्तांनी नोंद घेतल्यानंतर गुन्हा नोंद, आरोपींना अटक

पुणे – बंदोबस्तावरून घरी परतणारे पोलीस हवालदार चंद्रकांत जाधव यांना ४ तरुणांनी मारहाण केली. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात पोलिसांनी तक्रार प्रविष्ट करण्यास टाळाटाळ केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी पोलीस हवालदार जाधव यांनाच तडजोड करण्यासाठी आणि गुन्हा नोंद न करण्यासाठी दबाव टाकला. (गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करणार्‍या संबंधित अधिकार्‍याला सेवेतून कायमचे बडतर्फ केले पाहिजे ! – संपादक) हे प्रकरण पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना समजले. त्यानंतर गुन्हा नोंद करून ४ आरोपींना कह्यात घेण्यात आले. (पोलीस ठाण्यात खुद्द पोलीस कर्मचार्‍याला मारहाण केल्याचा गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ होत असेल, तर सामान्य तक्रारदाराची काय स्थिती असेल ? हे पोलीस खात्याला लज्जास्पद नव्हे का ? – संपादक)

पोलीस कर्मचारी चंद्रकांत हे रात्री १ वाजता बंदोबस्तावरून घरी जात होते. त्या वेळी रूपेश मांजरेकर, अनिकेत चव्हाण, अनिकेत घोडके आणि अभी डोंगरे हे तरुण रस्त्यावर गोंधळ घालत होते. तेव्हा जाधव यांनी ‘गोंधळ का करताय ?’, अशी विचारणा केली. तेव्हा त्या चौघांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचार्‍याचा गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली. पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना बोलावून चौकशी केली. त्यानंतर ३ दिवसांनी गुन्हा नोंद करण्यात आला. मारहाण करणार्‍या ४ आरोपींना त्वरित अटकही करण्यात आली. (पोलिसांच्या बोटचेपी वागण्यामुळे, तसेच दबावासमोर झुकल्यामुळे समाजात पोलिसांची प्रतिमा मलीन होत आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणार्‍या पोलीस प्रशासनाचा खर्चिक डोलारा राज्यात हवाच कशाला ?