अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण
पुणे – अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्याविषयी पोलीस आयुक्त काय बोललेत, हे बघितलेले नाही; मात्र असे जर कुणी म्हणत असेल, तर त्याने स्वत:च्या डोक्याचे ‘चेकअप’ (पडताळणी) करून घेतले पाहिजे. या प्रकारे ‘क्लीन चिट’ (निर्दोेष) कशी दिली जाऊ शकते ? कमाल आहे’, अशा शब्दांमध्ये भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवजयंती कार्यक्रमानिमित्त ते पुणे येथे आले होते. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते.
छत्रपती उदयनराजे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेले विचार आजही आपण आचरणात आणतो. आज जी लोकशाही आहे, तिचा ढाचा छत्रपती शिवाजी महाराज यांनी रचला आहे. ३९५ वर्षे उलटल्यानंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत आहे; कारण छत्रपतींनी रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले होते.’’
गुन्ह्याचा प्रकार दिसत नाही ! – पोलीस आयुक्त अमितेशकुमार
राहुल सोलापूरकर यांचे व्हिडिओ पुणे पोलिसांनी पडताळली आहे. यात अजून तरी काही गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही. आवश्यकता पडल्यास राहुल सोलापूरकर यांना चौकशीसाठी बोलवून घेऊ, असे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी म्हटले होते. |
सोलापूरकर यांचे वादग्रस्त विधान
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी आगर्याहून सुटका करतांना लाच दिली होती’, अशा विधानाची चित्रफीत सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यावर पुणे पोलीस आयुक्तांनी वक्तव्य केले होते.