शोधमोहीम राबवून बांगलादेशी घुसखोरांना साहाय्य करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा ! 

घुसखोरांविरोधातील मुंबईतील मूक निदर्शनात हिंदु जनजागृती समितीची मागणी !

आंदोलनात सहभागी धर्माभिमानी

मुंबई, २० फेब्रुवारी (वार्ता.) – बांगलादेशी घुसखोरांमुळे रोजगाराची समस्या, सामाजिक अस्थिरता, गुन्हेगारी आदी अनेक समस्या वाढत आहेत. असे असूनही मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आदी ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत्या प्रमाणाविरोधात सरकारकडून ठोस कृती करण्यात आलेली नाही. बांगलादेशी घुसखोरांविरोधात शोधमोहीम राबवून त्यांना साहाय्य करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी दादर (पश्चिम) रेल्वेस्थानकाच्या बाहेर २० फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरोधातील मूक निदर्शनात केली.

वैशिष्ट्यपूर्ण – शेकडो नागरिकांनी स्वाक्षरी करून या निदर्शनाचे समर्थन केले. युवक या मूक निदर्शनांचे चित्रण करत होते. अनेक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी या मूकनिदर्शनाचे वृत्तसंकलन केले.

घुसखोरांपासून देशाला वाचवण्यासाठी प्रत्येक हिंदूने जागृत आणि संघटित व्हावे ! – बाबुभाई भवानजी, माजी उपमहापौर, मुंबई

बांगलादेशातील घुसखोर येथे येऊन पैसे कमावतात. येथील साधन-सुविधांचा लाभ घेतात. आपली लोकसंख्या वाढवतात. आधार कार्ड, पॅन कार्ड अशी ओळखपत्रे बनवून घेतात. यामध्ये काही राजकीय मंडळी यांना साहाय्य करतात. मात्र नंतर हे घुसखोर येथे अपराधिक आणि आतंकवादी कृतींमध्ये सक्रिय होतात. देशाच्या सुरक्षेसाठी हा मोठा धोका आहे. म्हणून त्यांना देशाबाहेर काढले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक हिंदूने जागृत आणि संघटित व्हावे !