Sanatan Rashtra : भारताला ‘सनातन राष्ट्र’ बनवण्यासाठी साधूसंतांनी बनवली ‘ऋषि राज्यघटना’ !

श्री काशी सुमेरपिठाचे शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती यांनी महाकुंभमेळ्यात घेतला निर्णय

श्री काशी सुमेरपिठाचे शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती

प्रयागराज – महाकुंभात साधूसंतांनी भारताला सनातन राष्ट्र बनवण्याच्या दिशेने पहिले पाहुल उचलले आहे. त्यांनी ‘ऋषि राज्यघटना’ बनवली आहे. यांतर्गत ‘ऋषि राज्यघटने’ला आधार म्हणून देशातील साडेपाच लाख गावांना सनातन धर्माशी जोडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. श्री काशी सुमेरपिठाचे शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती यांनी सांगितले, ‘मी वर्ष २००१ पासून ‘ऋषि राज्यघटना’साठी काम करत होते. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यामध्ये झालेल्या ४ बैठकांनंतर ते सिद्ध करून सर्वसामान्यांसमोर सादर करण्यात आले आहे.

१. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण येथील १५ संतांच्या पथकाने वैदिक सनातन शास्त्रे  आणि पुराणे यांवर आधारित ही राज्यघटना बनवली आहे. यांतर्गत प्रत्येक सनातनी व्यक्तीला एका गावाचे ‘सनातन गाव’मध्ये रूपांतर करण्याचे दायित्व दिले जाईल. यासाठी ३०० संतांचा एक गट सिद्ध करण्यात आला आहे. या मोहिमेचा प्रारंभ ओडिशा, पंजाब आणि बंगाल या राज्यांतील गावांपासून होईल.

२. ‘ऋषि राज्यघटने’च्या अंतर्गत १७ मोहिमा चालवल्या जातील. यामध्ये विचार क्रांती, आध्यात्मिक क्रांती, संपर्क क्रांती, सेवा क्रांती, धार्मिक जागरण, संस्कृती क्रांती, गाय क्रांती, युवा क्रांती, व्यवस्था क्रांती, महिला जागरण, समानता क्रांती, शिक्षण क्रांती, आरोग्य क्रांती, व्यसनमुक्ती, स्वावलंबन, हरित क्रांती आणि सामाजिक सुसंवाद यांचा समावेश आहे.

३. ‘ऋषि राज्यघटने’चे उद्दिष्ट जागतिक शांतता प्रस्थापित करणे आहे आणि गायीला केंद्रस्थानी ठेवून जागतिक शांतता योजना सिद्ध करण्यात आली आहे. जनजागृतीच्या माध्यमातून समाजात एक मोठी क्रांती घडवून आणणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. सुदर्शन चक्राला केंद्रस्थानी ठेवून महाक्रांती मोहीम सिद्ध करण्यात आली आहे.