|
रत्नागिरी – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले भगवे ध्वज, पारंपरिक पोषाखातील शिवप्रेमी, पदयात्रा, ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘हर हर महादेव’, अशा जयघोषात, लेझीम, ढोलच्या निनादात १९ फेब्रुवारी या दिवशी जिल्ह्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने संपूर्ण जिल्हा दुमदुमून गेला. शिवजयंतीमुळे जिल्ह्यात सर्वत्र शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
शासनाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधून ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली. छत्रपतींच्या वेशभूषेतील विद्यार्थी, तसेच पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थिनी या लक्ष वेधून घेत होत्या. जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ‘अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम आपणा सर्वांना करावयाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपण पुढे न्यायची आहे’, असे आवाहन पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी केले. पदयात्रेच्या मार्गात शिवसृष्टीजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा पुतळा यांना मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला.
पदयात्रेमध्ये दामले विद्यालय, पटवर्धन हायस्कूल, एन्.सी.सी., स्काऊट आणि गाईड यांचे विद्यार्थी, विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी, शासकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, भागेश्वर विद्यामंदिरचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
श्रीराम सेवक मंडळ, पाचल पंचक्रोशीच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त शिवरायांची पूजा, अभिषेक, आरती, वाहन फेरी, पायी मिरवणूक, वक्तृत्व स्पर्धा, हळदीकुंकू आणि मर्दानी खेळ, असे कार्यक्रम करण्यात आले.
लांजा तालुका मराठा संघाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवप्रतिमेचे पूजन करून शहरातील केदारलिंग मंदिर येथून शिवप्रतीमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
गुहागर येथे शिवतेज फाऊंडेशन, गुहागर आणि गुहागरवासीय यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवपादुका पालखी मिरवणूक काढण्यात आली. शहरातून बाजारपेठ मार्गे श्री देव व्याडेश्वर मंदिर, वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिर येथे आल्यावर शिवरायांच्या पादुका आणि श्री दुर्गा भवानीमाता यांचे विधीवत् पूजन आणि भेट सोहळा पार पडला. गोपाळगडाकडे पादुका पूजन आणि ध्वजारोहण करून शिवजयंती उत्सवाची सांगता करण्यात आली. यासह अनेक शिवप्रेमी मंडळे, शाळा, महाविद्यालये येथेही शिवजयंती साजरी करण्यात आली.