Prayagraj Sangam Water Quality : प्रयागराजच्या त्रिवेणी संगमातील पाणी अंघोळ आणि पिणे यांसाठी अयोग्य !

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित लवादाला सादर केलेल्या अहवालात दावा

नवी देहली – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रयागराजच्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी असलेले पाणी अंघोळीसाठी अजिबात योग्य नाही, तसेच हे पाणी प्राशन करण्यालायकही नाही, असे म्हटले आहे. मंडळाचा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर करण्यात आला आहे. यात म्हटले की, संगमावरील पाण्यात ‘फिकल कोलीफॉर्म’चा (जीवाणू) स्तर पुष्कळ वाढला आहे.

१. मंडळाच्या संशोधन पथकाने प्रयागराज येथील अनेक घाटावरून पाण्याचे नमुने गोळा केले. हे नमुने तपासल्यानंतर त्यामध्ये प्रदूषणकारी घटकांची संख्या अधिक असल्याचे आढळले. संगमावर प्रतिदिन कोट्यवधी लोक आंघोळ करत असल्यामुळे ‘फिकल कोलीफॉर्म’चा स्तर वाढला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

२. महाकुंभ चालू होण्यापूर्वीच येथील पाण्याच्या स्वच्छतेच्या संदर्भात राष्ट्रीय हरित लवादामध्ये एक याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती. अहवाल मिळाल्यानंतर हरित लवादाने पुढील सुनावणीसाठी उत्तरप्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सचिव यांना सुनावणीसाठी उपस्थित रहाण्याचा आदेश दिला आहे.

संपादकीय भूमिका

प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात आतापर्यंत ५५ कोटी भाविकांनी स्नान केले आहे. या काळात त्रिवेणी संगमातील नदीच्या पाणी अस्वच्छ नसल्याचे २ संस्थांकडून सांगण्यात आले. गेल्या एक महिन्याहून अधिक काळात या पाण्यामुळे कोणताही संसर्ग झाल्याचे आढळून आलेले नाही, ही वस्तूस्थिती आहे !