कसबा, संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची नित्यपूजा करण्याचे व्रत

संगमेश्वरमधील शिवप्रेमींचा पुढाकार

कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक

संगमेश्वर – तालुक्यातील कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाची (पुतळ्याची) नित्यपूजा करण्याचे व्रत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने घेण्यात आले असून गेले  १५ महिने नित्यपूजेचे व्रत चालू आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक नित्यपूजा समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कसबा हे केवळ एक गाव नसून या कोकण भूमीला लाभलेला एक मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. संगमेश्वरची ओळख ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कट करून, फितुरी करून पडकले गेले ते गाव’, अशी झाली आहे. ही ओळख पालटून ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म आणि त्याग या मार्गावर चालणारा तालुका, शिवशंभूपाईकांचा तालुका’, अशी संगमेश्वरला ओळख प्राप्त करून देण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व धारकरी, कसबा ग्रामस्थ आणि संगमेश्वरमधील श्री शिवशंभोप्रेमी यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे नित्यपूजनाचे अखंड व्रत घेतले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक नित्यपूजा समितीचे प्रमुख सिद्धेश चव्हाण, श्रेयस शेट्ये, निशांत जाखी, जीवन जाधव आणि अविनाश पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.