साथीच्या रोगांचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचे आवाहन
रत्नागिरी – राज्यातील गुइलेन बरे सिंड्रोम (जी.बी.एस्.) विषाणूचा, तसेच अन्य साथीच्या रोगांचा वाढता संसर्ग रोखण्याकरिता पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासह पाण्याचे स्रोत, तसेच शाळा, अंगणवाडी, घरे इत्यादी ठिकाणी पुरवण्यात येणार्या पाण्याची प्रत्येक महिन्यातून एकदा जैविक आणि रासायनिक तपासणी करावी, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किर्तीकिरण पुजार यांनी केले.
जी.बी.एस्. विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता शुद्ध पाणीपुरवठा होण्याच्या अनुषंगाने गाव पातळीवर नळपाणीपुरवठा योजनांचे स्रोत शाळा, अंगणवाडी आणि नळाद्वारे घरामध्ये उपलब्ध होणारे पाणी यांच्या जैविक तपासणीसाठी आवश्यक पाणी नमुने अभियान स्वरूपामध्ये गोळा करून नजीकच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेमध्ये जमा करावे. सर्वांना गुणवत्तापूर्वक शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट निश्चित करावे. साथीच्या रोगांचा संसर्ग टाळण्यासाठी पाणीपुरवठा, स्वच्छता विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि पंचायत समिती या विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.