Devendra Fadnavis On Love Jihad : लव्ह जिहादच्या नावावर वाढत असलेल्या घटना निश्‍चितच वाईट ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

नागपूर – लव्ह जिहादच्या नावावर वाढत असलेल्या घटना निश्‍चितच वाईट आहेत. खोटी ओळख देत समोरच्या व्यक्तीची फसवणूक करत लग्न करणे आणि मुले जन्माला घालून त्यांना सोडून देणे, ही प्रवृत्ती वाढत चालली आहे. यात फूस लावणे, फसवणे किंवा जाणीवपूर्वक खोटारडेपणा करणे यांचा अंतर्भाव असून हे योग्य नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ फेब्रुवारीला प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले.

सर्वोच्च न्यायालयानेही दिलेल्या निर्णयात लव्ह जिहादची वास्तविकता प्रदर्शित केली आहे. केरळ उच्च न्यायालयाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. लव्ह जिहादच्या घटनांच्या संदर्भात राज्य सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

महाराष्ट्रासारख्या राज्यात सातत्याने अशा घटना घडत आहेत. एका धर्माच्या व्यक्तीने दुसर्‍या धर्माच्या व्यक्तीसमवेत लग्न करणे वाईट नाही; मात्र स्वत:ची खोटी ओळख देत लग्न करणे, मुले झाल्यावर त्यांना सोडून देणे, ही गंभीर घटना आहे. यासाठीच या संदर्भात योग्य तो कायदा राज्य सरकार करणार आहे.