कोल्हापूर – वर्ष २०२५ मध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले; मात्र ‘छावा’ चित्रपट आगाऊ नोंदणी आणि पहिल्या दिवशीचे उत्पन्न यांत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारीला ३१ कोटी रुपये कमावले आहेत. छावाचे इतके आकर्षण पहायला मिळत आहे की, जवळपास दिवसभरातील सर्व खेळ ‘हाऊसफुल्ल’ आहेत. केवळ मुंबईतच १ सहस्र ३०५ खेळ असून देहलीत १ सहस्र २९२ खेळ आहेत. कोल्हापूरसारख्या शहराचा विचार केल्यास ५० हून अधिक खेळ कोल्हापूर शहरात आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांचे अतुलनीय शौर्य आणि हिंदु धर्मासाठी केलेल्या त्याग पहाण्यास विशेषकरून तरुण पिढी अतिशय उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.