कोट्यवधी लोकांनी स्नान करूनही गंगा नदीच्या पाण्यातील क्षारांविषयी आश्चर्यजनक संशोधन !

गंगा नदीच्या पाण्याची गुणवत्ता ‘स्नानासाठी’ होती उत्तम !

‘टोटल डिजॉल्व्ह सॉलिड्स’ (टी.डि.एस्.), म्हणजे पाण्यातील क्षार मोजण्याचे प्रमाण. ‘टी.डि.एस्. मीटर’ नावाच्या छोट्याशा यंत्राने ते मोजता येतात. पिण्याच्या पाण्याविषयी बोलायचे झाले, तर साधारणपणे १०० ते १५० ‘टी.डि.एस्.’ ही पातळी योग्य क्षार असलेली पातळी गणली जाते. अंघोळीच्या पाण्यात ५०० हून अधिक ‘टी.डि.एस्.’ असणे, हे त्वचा, केस यांकरता हानिकारक समजले जाते.

वैद्य परीक्षित शेवडे

आपल्या ‘स्विमिंग पूल’मध्ये (पोहण्याच्या तलावामध्ये) साधारणपणे १५०० च्या आसपास ही पातळी नियंत्रित ठेवली जाते. त्याच्यावर गेल्यास त्वचेच्या अडचणी दिसू शकतात. कुंभमेळ्यात ऐन मौनी अमावास्येला, जिथे काही कोटी लोकांनी स्नान केले होते तिथल्या, म्हणजेच संगमाच्या पाण्याचे नमुने घेऊन आम्ही ‘टी.डि.एस्.’ पडताळले. या क्षेत्रात काम करणार्‍या मित्रांना आधी मत विचारले असता इतके लोक स्नान करत आहेत, म्हटल्यावर साधारणपणे २००० च्या आसपास, म्हणजेच त्वचा, केस यांना हानिकारक अशी संख्या येईल, असा त्यांचा तर्क होता. प्रत्यक्षात आम्ही पडताळल्यावर ही संख्या जेमतेम ३०० इतका, म्हणजे स्नानासाठी अगदीच उत्तम पातळीत होता ! कोट्यवधी लोकांनी स्नान केले, त्या दिवशी आणि त्या स्थानीही पाण्याची गुणवत्ता ‘स्नानासाठी’ उत्तम होती. याचा एक अर्थ असा आहे की, हे पाणी वहाते ठेवण्यात योगी सरकारने उत्तम कार्य केले आहे.

दोन वर्षांपूर्वी नर्मदामय्याचे (नर्मदा नदीचे) पाणी आणले होते. त्याचा आजच्या घडीला ‘टी.डि.एस्.’ निघाला १०० च्या आसपास. हे सगळे विस्तृत संशोधनाचे विषय आहेत. मी केवळ छोटे निरीक्षण नोंदवत आहे; मात्र प्रत्यक्ष प्रयोग करून मगच लिहित आहे. नद्या मातृस्वरूप आहेत. आपल्याला आईप्रमाणे जपतात हेच खरे !

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (८.२.२०२५)