महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ कायदा करावा !

निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र मंदिर महासंघाची निवेदनाद्वारे मागणी !

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांना निवेदन देतांना डावीकडून सर्वश्री भरत शिंदे, गणेश पलंगे, ठाणगे बापू, अजिंक्य गायकवाड, नागपुरे काका, अमित डोंगरे

अहिल्यानगर – देवस्थानांच्या शेतभूमी बर्‍याच प्रमाणात ‘लँड ग्रॅबर’द्वारे (भूमाफिया) अवैधरित्या हडपल्या जात आहेत. याविषयी महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबिंग (भूमी चोरी प्रतिबंध)’ कायदा आणण्यासाठी अध्यादेश काढावेत. ‘भूमी हडपणार्‍यांच्या विरोधात विशेष पथकाची नेमणूक करून योग्य ती कारवाई करावी आणि देवस्थान किंवा देवस्थान शेतभूमी यांविषयी कोणत्याही प्रकारची निर्णय प्रक्रिया राबवतांना त्यात महाराष्ट्र मंदिर महासंघाला बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी’, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने अहिल्यानगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांना निवेदन देऊन करण्यात आली. (अशा मागण्या का कराव्या लागतात ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक) या वेळी सर्वश्री भरत शिंदे, गणेश पलंगे, ठाणगे बापू,अजिंक्य गायकवाड, नागपुरेकाका, अमित डोंगरे उपस्थित होते.