Delhi Election Results : २७ वर्षांनंतर देहलीत भाजपचे सरकार !

  • देहलीमध्ये ‘आप’चा पराभव

  • अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सौरभ भारद्वाज यांचा पराभव

  • मुख्यमंत्री आतिषी चुरशीच्या लढतीत विजयी

  • भाजपचे परवेश वर्मा मुख्यमंत्री होण्याची शक्यता

 

नवी देहली – देहली विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाचा पराभव झाला असून २७ वर्षांनंतर भाजपने देहलीची सत्ता मिळवली आहे. ७० मतदारसंघांपैकी भाजपला ४८ जागांवर, तर आपला २२ जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसचे पानीपत झाले असून तिला एकही जागा जिंकता आलेली नाही. विशेष म्हणजे या निवडणुकीत आपचे सर्वेसर्वा असणारे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, तसेच अन्य मंत्री सौरभ भारद्वाज, सत्येंद्र जैन, सोमनाथ भारती यांचा पराभव झाला आहे. सध्याच्या मुख्यमंत्री आतिषी या चुरशीच्या लढतीत शेवटच्या फेरीनंतर विजयी झाल्या आहेत. आपमधील भाजपमध्ये आलेले कपिल मिश्रा आणि कैलाश गेहलोत हे विजयी झाले आहेत.

देहलीकरांची सेवा करण्यासाठी आम्ही अधिक बळकटीने काम करू ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

विकास आणि सुशासन यांचा विजय झाला आहे. देहलीतील सगळ्या भावा-बहिणींना मी वंदन करत आहे. त्यांनी आम्हाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे. मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो.

देहलीचा चौफेर विकास केला जाईल, यात शंकाच नाही. देहलीकरांचे आयुष्य उत्तम होईल, यासाठी आम्ही कुठलीही कसर सोडणार नाही. विकसित भारताच्या निर्मितीत देहलीची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मला भाजपच्या कार्यकर्त्यांवरही गर्व आहे, ज्यांनी हा विजय मिळवण्यासाठी प्रचंड परिश्रम केले. देहलीकरांची सेवा करण्यासाठी आम्ही आता अधिक बळकटीने काम करू.

केजरीवाल यांचा पराभव करणारेच होऊ शकतात भावी मुख्यमंत्री !

आमदार परवेश वर्मा

भाजपचे आमदार परवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांना ३ सहस्र १८२ मतांनी पराभूत केले असून त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात आहे. त्यांचे वडील साहिब सिंह वर्मा हे १९९० च्या दशकात देहलीत भाजपची सत्ता असतांना मुख्यमंत्री राहिले होते. तसेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय कामगार मंत्री हे पदसुद्धा भूषवले होते.

भाजपच्या ४० जागा वाढल्या, तर ‘आप’च्या ४० जागा घटल्या

वर्ष २०२० च्या, म्हणजेच मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जागा ४० ने वाढल्या. मागच्या वेळी भाजपला केवळ ८ जागा जिंकता आल्या होत्या. ‘आप’ने ४० जागा गमावल्या आहेत. तिला मागील वेळेस ६२ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला मागील वेळेस एकही जागा मिळाली नव्हती आणि याही वेळी ती एकही जागा जिंकू शकली नाही.


हे ही वाचा → संपादकीय : राजधानीची ‘आप’दा मुक्ती !


भाजपच्या मतांच्या टक्केवारीत ९ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ, तर आपला १० टक्क्यांचा फटका

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या मतांच्या टक्केवारीत यंदा ९ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. त्याच वेळी, ‘आप’ला १० टक्क्यांपेक्षा अधिक हानी झाली आहे. काँग्रेसला एकही जागा मिळाली नसली, तरी तिच्या मतांचा वाटा २ टक्क्यांनी वाढला आहे. (आता काँग्रेसवर यालाच ‘यश’ म्हणण्याची नामुष्की आली आहे, हे जाणा ! – संपादक)

केजरीवाल यांची वाताहत !

वर्ष २०२० मध्ये, केजरीवाल तिसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले, परंतु दारू घोटाळ्यामुळे कारागृहात गेलेले केजरीवाल बाहेर आल्यानंतर त्यांनी पदाचे त्यागपत्र दिले. ते ४ वर्षे ७ महिने आणि ६ दिवस मुख्यमंत्री राहिले. यानंतर त्यांनी आतिशी यांना मुख्यमंत्री बनवले. देहलीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून ६०० मतांनी पराभूत झाले. त्यांनी सांगितले की, आम्ही पुष्कळ परिश्रम घेतले, पण जनतेचा निर्णय आमच्या बाजूने आला नाही. आम्हाला तिचा निर्णय मान्य आहे.

देहली दंगलीतील आरोपी ताहिर हुसेन पराभूत

देहलीमध्ये वर्ष २०२० मध्ये झालेल्या दंगलीतील आरोपी असणारे आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसेन मुस्तफबाद या मुसलमानबहुल मतदारसंघातून ए.आय.एम्.आय.एम्.कडून (‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’कडून, अखिल भारतीय मुसलमान एकता संघाकडून) उभे होते. त्यांचा पराभव भाजपचे उमेदवार मोहन सिंह बिष्ट यांनी केला. ताहिर हुसेन चौथ्या क्रमांकावर राहिले. आप आणि काँग्रेस यांचे उमेदवार दुसर्‍या अन् तिसर्‍या क्रमांकावर होते. मुसलमानबहुल भागात भाजपचा उमेदवार विजयी झाल्याने मुसलमानांनी भाजपला मतदान केल्याचे म्हटले जात आहे.

जनतेचा निर्णय आम्हाला मान्य ! – काँग्रेस

संदीप दीक्षित

काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले की, आम्ही सूत्रे उपस्थित केली; पण मला वाटते की, लोकांना वाटले की, आम्ही सरकार स्थापन करणार नाही. जनतेचा निर्णय आम्हाला मान्य आहे.

आम्ही ‘आप’च्या खोट्या आश्‍वासनांवर आवाज उठवला ! – भाजप

वीरेंद्र सचदेवा

भाजपच्या उमेदवारांनी पुष्कळ परिश्रम केले. देहलीच्या मतदारांनी विकास आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार निवडण्याला कौल दिला आहे. आम आदमी पक्षाने खोटी आश्‍वासने दिली होती. आम्ही वास्तविक सूत्रांवर निवडणूक लढवली. तुटलेले रस्ते, दारू धोरणाचा वाद, खराब पाणी आणि भ्रष्टाचार यांसारख्या सूत्रांवर आम्ही आवाज उठवला अन् आपने दिलेल्या खोट्या आश्‍वासनांना लोकांच्या समोर आणले, असे भाजपचे विजयी उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी सांगितले.