
अंतिमतः तब्बल २७ वर्षांनंतर देशाच्या राजधानीत ‘मोदींची जादू’ चालली आणि केजरीवालांचा सुपडा साफ झाला आहे. भ्रष्टाचार आणि घोटाळे यांच्या गटाराचे पाणी डोक्यावरून वाहिले अन् सकाळी उठून शिव्यांची लाखोली अन् खोटे बोलणे याला देहलीची जनता अगदी कंटाळली. मुसलमान, दलित आणि उच्च मध्यमवर्गीय या सर्वांचीच थोडी अधिक मते भाजपला मिळाली अन् कंगाल झालेल्या राजधानीच्या तिजोरीच्या चाव्या शेवटी भाजपच्या हाती आल्या. देहलीमधील पूर्वांचल, सीमावर्ती, हरियाणा अशा अनेक भागांमध्ये भाजपच्या जागा वाढल्या आहेत.
१३ वर्षांपूर्वी रामलीला पटांगणात भ्रष्टाचाराच्या विरोधात नाट्यमय आंदोलन उभारून एका वेगळ्या पर्वाची हूल देणार्या ‘आम आदमी पक्षा’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचे ते नाट्य अगदी अल्प काळ टिकले आणि बघता बघता हे माजी प्रशासकीय अधिकारी अल्पावधीत स्वतःच एक घोटाळ्याचे महारूप होऊन पुढे आले. इतकेच नाही, तर नक्षली, खलिस्तानी आदी देशद्रोही प्रवृत्तींशी त्यांची जवळीक असल्याचे उघड झाले; किंबहुना ‘केजरीवाल हे खलिस्तानी आणि ‘डीप स्टेट’ यांचेच प्यादे आहेत’, असेच लक्षात येत आहे.
भ्रष्ट आणि देशविरोधी यांना नाकारले !

२५ सहस्र रुपयांवरून थेट ५ कोटी रुपये एवढे दारू परवान्याचे शुल्क करणे, त्यासाठी दारू विक्रेत्यांकडून लाच घेणे या प्रकारे केलेल्या दारू घोटाळाप्रकरणी मागील वर्षी मार्च मासात केजरीवाल आणि त्यांचे सहकारी यांना ‘ईडी’ने अटक केली; पण त्यांचे घोटाळे अमर्याद होते. वर्गखोल्यांचा घोटाळा, पाण्याचा २९ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा, देहलीतील बसगाड्यांचा घोटाळा, सीसीटीव्ही घोटाळा अशी घोटाळ्यांची मालिका रचणारे केजरीवाल निगरगट्टच असल्याचे लक्षात आले. केजरीवालांचे सचिव आणि सुरक्षारक्षक यांनी त्यांच्याच पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण केली. अशांनी महिलांसाठी कितीही पैसे वाटले, तरी त्यांची महिलाविरोधी वृत्ती त्यातून दिसून आली. केजरीवालांनी योजनांची ‘बौछार’ केली; परंतु राज्याची तिजोरी रिकामी करून सुविधा देणार्यांना जनतेने नाकारले. १० वर्षांत एकही शिक्षणसंस्था न उघडता ‘फोर्स विद्यापिठा’साठी लाखो रुपये गोळा करूनही २ खोल्यांव्यतिरिक्त एकही वीट उभी राहिली नाही; याउलट मोदी यांनी देहलीत ४ मोठ्या शिक्षणसंस्था उभारण्याचे काम चालू केले. देहलीतील खड्ड्यांच्या रस्त्यांनी ६२ लोकांचा जीव घेतला; पण मोदींनी देहलीला जोडणार्या महामार्गांची निर्मिती पूर्णत्वास नेली. ‘कोविड’ महामारीमध्ये केंद्राने दिलेले पैसे जनतेपर्यंत पोचलेच नाहीत. ‘आप’ने एकही नवीन बसगाडी खरेदी केली नाही; उलट ‘भारत मंडपम्’, ‘इको पार्क’, ‘सीता पार्क’ यांसारखी निर्मिती करून भाजपने जनतेची मने जिंकली.
दलितांचे वैरी ?
पक्षस्थापनेच्या आरंभी दलितांचे कैवारी असल्याचा आव आणून देहलीतील दलितबहुल सीमापुरा भागात केजरीवाल यांनी पक्षाचे कार्यालय उघडले आणि पक्षाचे चिन्हही ‘खराटा’ ठेवले. याच केजरीवालांनी पुढे ‘डॉ. आंबेडकरांनी मद्याच्या नशेत राज्यघटना लिहिली’, असे विधान केले. याच दलित वस्ती असलेल्या झुग्गी लोकांना प्रतिदिन ७० रुपये मोजून १ लिटर पाणी विकत घ्यावे लागते. येथील २० सहस्र ७०० लोक घाण पाणी पिऊन गेले. केजरीवालांनी येथील लोकांना घरे देण्याचे वचन देऊन फसवले. मोदींनी मात्र ५ सहस्र झुग्गी समाजाला घरे देण्याचे वचन देऊन त्यांतील ३ सहस्रांना घरे दिलीही. या सर्वांचा परिणाम म्हणून आतापर्यंत कधीही न मिळालेल्या दलितांच्या १२ पैकी ५ जागा भाजपला मिळाल्या.
काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी निकालाच्या दिवशी सकाळी ११ वाजता सांगितले की, अजून त्यांनी निकाल पाहिले नाहीत. यावरून काँग्रेसच्या दुःस्थितीविषयी न बोललेच बरे ! यानंतर उत्तरप्रदेश आणि बंगाल राज्यांच्या निवडणुका येतील, त्यांच्यावरही या निकालाचा सकारात्मक परिणाम होईल.
भाजपकडून अपेक्षा !
वीज, पाणी आदींमधील सुविधा तशाच ठेवण्याचे आणि महिलांचे मानधन वाढवण्याचे वचन भाजपने दिले. शहरात रस्ते आदी सुविधा केल्या. जनतेलाही वाटले, देशाच्या विकासाप्रमाणे देहलीचाही विकास व्हावा आणि जनतेने त्यांना कौल दिला; परंतु देहलीला लुटणारी ‘रेवडी संस्कृती’ पूर्णतः संपवण्यासाठी भाजपला कष्ट घ्यावे लागतील. जनतेला केंद्र आणि राज्य यांचा समन्वय असणारे सरकार हवे होते. सरकारने आता ‘दुहेरी यंत्रणे’च्या सरकारचा खरोखरच देहलीला लाभ करून दिला पाहिजे. आता या यशाचे चीज करून त्याची फलनिष्पत्ती दाखवणे, हे भाजपचे दायित्व आहे. भाजपने सांगितल्याप्रमाणे ‘यमुना जल पिण्यासारखे शुद्ध करून दाखवणे’, हे त्यांचे सर्वप्रथम कर्तव्य राहील. भाजप नेत्यांनी मुस्तफाबादचे नामांतर करण्याचे घोषित केले आहे. देहलीतील सर्वच परकीय नावांचे रस्ते, वास्तू यांची नावे पालटली जाण्याची जनता आतुरतेने वाट पहात आहे. देहली ही सनातन भारताची राजधानी आहे आणि देहलीचा विकास करतांना तिला भारतीय संस्कृती कणाकणातून प्रस्फुटित करणारी ‘इंद्रप्रस्थ’ बनवणे, हे आता भाजपचे कर्तव्य आहे; परंतु त्यासाठी सर्वप्रथम देहलीला पूर्णतः सुरक्षित करावे लागेल. गुन्हेगार, बलात्कारी यांपासून सुरक्षित जीवन जनतेला देण्यासाठी अतिशय कडक कायदा सुव्यवस्था जनतेला अपेक्षित आहे. २ दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पॅलिस्टिनींसह आतंकवाद्यांनी राजधानीत दंगली करण्याची भाषा केली आहे. या माध्यमातून देशाच्या सीमेवर काश्मीरवर आक्रमण करण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत. त्यामुळे देहलीला दंगलींपासून पूर्णतः सुरक्षित करण्यासाठी शासनाला डोळ्यांत तेल घालून देहलीचे रक्षण करावे लागणार आहे. त्यासाठी आतंकवाद्यांच्या सर्व सुप्त कारवाया करणारी माणसे आणि त्यांच्या वाटा यांना तातडीने पायबंद घालावा लागेल. हे सर्व होण्यासाठी जनतेनेही जागरूक राहून सरकारला ते करण्यास भाग पाडावे लागेल. देहलीतील निकालाच्या परिवर्तनातून जनतेने ‘अयोग्य प्रशासन आणि घोटाळे करणारे सरकार नको आहे’, हे दाखवून दिले. केजरीवाल यांची सत्ता उखडणे, म्हणजे एक प्रकारे ‘डीपस्टेट’ आणि ‘खलिस्तानी’ यांचाही पराजय आहे. जनतेला राष्ट्रापुढील या समस्या मुळापासून उखडून टाकायच्या असतील, तर तिला हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही, हेही या निमित्ताने लक्षात घेतले पाहिजे !
देहलीला ‘इंद्रप्रस्थ’ बनवण्याचे आव्हान भाजपने स्वीकारावे आणि जनतेने त्यासाठी सहयोगी बनावे ! |