शिक्षणक्षेत्रातील ‘प्रथम’ या संस्थेने देशपातळीवर ‘असर २०२४’ हा शैक्षणिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात १४ ते १६ वयोगटातील ५५ टक्के विद्यार्थ्यांचे सामाजिक माध्यमांवर वैयक्तिक खाते असल्याचे म्हटले आहे. या वयोगटातील ५५.२ टक्के विद्यार्थी अभ्यासासाठी ‘स्मार्टफोन’ (आधुनिक भ्रमणभाष)चा वापर करतात, असेही या अहवालातून समोर आले आहे. सामाजिक माध्यमे हाताळण्यात मुलींपेक्षा मुलांची संख्या अधिक असून ७५.१ टक्के मुले, तर ७०.८ टक्के मुली आहेत. याचाच एक परिणाम म्हणजे महाराष्ट्रात सरकारी शाळेतील पटसंख्या वर्ष २०२२ च्या तुलनेने वर्ष २०२४ मध्ये न्यून झाली आहे. पहिली ते पाचवीमध्ये वर्ष २०२२ मध्ये ७७.३ टक्के मुले शिकत होती. ही संख्या न्यून होऊन वर्ष २०२४ मध्ये ७१.५ टक्के आली आहे. मध्यंतरी कोरोना महामारीच्या काळात भ्रमणभाषद्वारे ऑनलाईन शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले होते. ते अद्याप ही चालू आहे. यावरून आपल्या लक्षात येते की, भ्रमणभाषच्या अनावश्यक वापरामुळे लहान वयातच मुलांवर कसे विपरित परिणाम होत आहेत.
लहान वयात घडलेला अयोग्य संस्कार मोठेपणी सहजासहजी घालवता येत नाही. त्याचा परिणाम शिक्षणासमवेतच स्वाभिमान, राष्ट्राभिमान यांविषयी येणार्या पिढीला याची जाणीव होऊ शकते का ? ‘स्मार्टफोन’च्या अतीवापरामुळे सध्याची पिढी बिघडत चाललेली आहे, हे बहुतांशी ऐकायला मिळते. ‘मुले आमचे ऐकत नाहीत. आम्ही काहीच करू शकत नाही’, असे पालकांचे म्हणणे असते. मुले पालकांचे ऐकत नाहीत, तर अशा बिघडलेल्या मुलांचे भवितव्य कोण सावरणार ? भ्रमणभाष अतीप्रमाणात वापरल्यामुळे होणार्या दुष्परिणामांची शिकवण आणि जाणीव शाळेतच करून देणे उचित ठरणार आहे. यासाठी सरकारी पातळीवर शिक्षणक्षेत्रात पालट करणे आवश्यक आहे. भ्रमणभाषने घड्याळ, रेडिओ, टेलिग्राम यंत्रणा, पोस्ट कार्ड, पुस्तके, वर्तमानपत्रे, गणकयंत्र, छायाचित्रक, दूरदर्शन, तसेच चित्रपटगृहे इत्यादींची वेगळी आवश्यकता एक-एक करून न्यून केली आहे. मुलांची वाचनाची आवड त्याने संपवली आहे. मुलांची शारीरिक खेळाची आवड संपवली आहे. आता घड्याळ हातात घालण्याची, आकडेमोड करण्याची आवश्यकता राहिलेली नाही.
जगभरातील सर्व ज्ञान हातात देऊन संगणकीय ज्ञानजाल आणि भ्रमणभाष यांनी सर्वांनाच व्यापले आहे अन् त्यांचा वेळ व्यापलेला आहे. यावरून आपल्या लक्षात आलेले असेल की, ‘स्मार्टफोन’ एक ब्रह्मराक्षस झाला आहे. त्यावर नियंत्रण कसे आणणार, याकडे शिक्षणतज्ञांनी लक्ष दिले पाहिजे. मुलांच्या जीवनात ‘स्मार्टफोन’च्या रूपाने आलेल्या या ब्रह्मराक्षसाच्या वापरावर मर्यादा आणली पाहिजे, या दृष्टीने प्रथम पालक, शिक्षक आणि शासन या सर्वांनी कठोर प्रयत्न केले पाहिजेत.
– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा.