Ajmer Dargah Diwan Writes To PM : अजमेरला ‘राष्ट्रीय जैन तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करा !

  • अजमेर दर्ग्याच्या दिवाणांची पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून मागणी

  • अजमेर दर्गा हिंदूंचे मंदिर आहे, अशी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करणार्‍या हिंदु सेनेकडून मागणीचे समर्थन

अजमेर (राजस्थान) – येथील ‘ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गा’ हिंदूंचे मंदिर असल्याचा दावा हिंदु सेनेकडून न्यायालयात करण्यात आला आहे. यावर खटला चालू आहे. या पार्श्‍वभूमीवर या दर्ग्याचे दिवाण सय्यद जैनुल आबेदीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अजमेरला ‘राष्ट्रीय जैन तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. या मागणीचे हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी स्वागत केले आहे.

दिवाण यांनी म्हटले आहे की,

भारत विविध धर्मांचा आणि समृद्ध आध्यात्मिक वारशाचा संगम आहे. हे सहस्रो संत, ऋषी आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांचे तपश्‍चर्येचे ठिकाण राहिले आहे. मानवतेच्या कल्याणासाठी संतांनी अमूल्य योगदान दिले आहे. अजमेरमध्ये ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांचा दर्गा आहे, पुष्कर हे भगवान ब्रह्माजींचे मंदिर आणि तलाव आहे. त्याचप्रमाणे आचार्य विद्यासागर यांचे दीक्षास्थानही याच शहरात आहे.

मी दर्गा दिवाणांच्या पत्राचा आदर करतो ! – विष्णु गुप्ता

विष्णु गुप्ता म्हणाले की, दर्गा दिवाण जेनुअल आबेदीन यांनी किमान हे मान्य केले की, हे येथे जैन मंदिरे आहेत. दर्गा दिवाणांच्या विधानावरून हे सिद्ध होते की, ऐतिहासिकदृष्ट्या जैन धर्माची मुळे अजमेरमध्ये खोलवर होती. ही गोष्ट केवळ धार्मिक नाही, तर ऐतिहासिक तथ्ये आणि पुरातत्वीय पुराव्यांशीही संबंधित आहे.

आम्ही दावा केला होता की, अजमेर दर्गा हे शिवमंदिर असण्यासोबतच जैन मंदिरही होते. दिवाणांच्या मागणीमुळे आमचे सूत्र बळकट होईल. एके दिवशी हेही उघड होईल की, भगवान शिवाचे संकटमोचन मंदिर पाडून दर्गा बांधण्यात आला आहे.